WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

‘त्या’ टँकरमध्ये पिफासचा अवशेष असल्याचा संशय


‘त्या’ टँकरमध्ये पिफासचा अवशेष असल्याचा संशय

माजी खासदार हुसेन दलवाई यांच्याकडून कारवाईची मागणी

मुंबई : खेड तालुक्यातील लोटे MIDC परिसरात लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीशी संबंधित संशयित केमिकलयुक्त टँकर पकडल्याच्या घटनेनंतर माजी खासदार हुसेन दलवाई यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

दलवाई यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लोटे पंचक्रोशीतील CETP परिसरात संशयास्पद टँकर येत असल्याची माहिती स्थानिकांना मिळाल्यानंतर ग्रामस्थांनी तत्काळ धाव घेत टँकर अडवला. या कारवाईत राजेंद्र आंब्रे, रवी गोवळकर, सचिन चाळके, गंगाराम चाळके, नितीन कडू, अजय चाळके, संजय चाळके, रोशन कालेलकर, सचिन काते, अंकुश चाळके, नंदू काते, अक्षय दिवेकर, संकेत हुमणे आदींसह इतर ग्रामस्थ सहभागी झाले होते

संबंधित टँकरमध्ये PFAS (Per- and Polyfluoroalkyl Substances) या अत्यंत घातक रसायनाचा अवशेष असल्याचा संशय आहे. PFAS हे मानवी आरोग्य आणि पर्यावरणासाठी अत्यंत धोकादायक असल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी होणे अत्यावश्यक आहे.

या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) यांना तात्काळ टँकर जप्त करून त्यातील नमुन्यांची तपासणी करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी केली आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी घटनास्थळी पंचनामा करून आवश्यक प्रशासकीय कारवाई करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

याशिवाय, पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 अंतर्गत गुन्हा दाखल करावा, तसेच RTO, महसूल विभाग आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी संयुक्तपणे या प्रकरणात दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी दलवाई यांनी केली आहे.

दलवाई यांनी पुढे नमूद केले की, पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 आणि Hazardous Waste Rules 2016 अंतर्गत अशा प्रकारच्या घातक रसायनांच्या हाताळणीबाबत कठोर नियम आहेत. त्यामुळे या प्रकरणात कोणतीही ढिलाई न करता दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी.

तसेच PFAS सारख्या घातक रसायनांच्या उत्पादन व विल्हेवाटीबाबत स्पष्ट आणि कठोर धोरण तयार करण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. संबंधित सर्व विभागांनी समन्वय साधून तातडीने कारवाई करावी, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.

दरम्यान, या घटनेमुळे लोटे MIDC परिसरातील पर्यावरणीय सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, प्रशासनाच्या पुढील भूमिकेकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

 


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!