दळवटणे येथे श्री कान्होबा काळीश्री झोलाई देवी त्रैवार्षिक यात्रा (समा)
लावणी सम्राज्ञी हिंदवी पाटील सादर करणार ‘हिऱ्याची हिरकणी’
चिपळूण : तालुक्यातील दळवटणे (बागवाडी) येथे ग्रामदैवत श्री कान्होबा काळीश्री झोलाई देवीची त्रैवार्षिक यात्रा (समा) मोठ्या उत्साहात साजरा होणार असून, यानिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक व पारंपरिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार दि. २५ मार्च व गुरुवार दि. २६ मार्च २०२६ पर्यंत हा उत्सव रंगणार आहे. चारगाव संघटना तसेच दळवटणे-बागवाडी, वालोटी, गाणे, खडपोली-दक्षिण विभागातील ग्रामस्थ मंडळ आणि दळवटणे-बागवाडी (मुंबई-पुणे) ग्रामस्थ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
धार्मिक विधी आणि पारंपरिक कार्यक्रमांची रेलचेल
बुधवार दि. २५ मार्च रोजी सकाळी ८ वाजता पारंपरिक पद्धतीने पूजा व लाट तोडण्याचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर दुपारी १२ वाजता अभ्यागतांचे स्वागत व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी ३ वाजता पारंपरिक वाद्यांच्या गजरात वालोटी मारुती मंदिर ते दळवटणे-बागवाडी मंदिर अशी लाटेची मिरवणूक काढण्यात येणार असून, विविध गावांतील ग्रामदैवतांच्या पालख्या मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. सायंकाळी ४ वाजता वालोटी मारुती मंदिर येथे पालख्यांचे आगमन होऊन पुढील कार्यक्रमांना सुरुवात होईल. सायंकाळी ६.३० वाजता श्री कान्होबा काळीश्री झोलाई मंदिर परिसरात पालख्यांचे आगमन होणार आहे. रात्री ९ वाजता भक्तांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली असून, रात्री उशिरापर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम सुरू राहणार आहेत.

लावणी कार्यक्रमाचे आकर्षण
या यात्रेचे प्रमुख आकर्षण म्हणजे महाराष्ट्राची लोकप्रिय लावणी सम्राज्ञी हिंदवी पाटील प्रस्तुत ‘हिऱ्याची हिरकणी’ विशेष लावणी कार्यक्रम होय. बुधवारी रात्री ११ वाजता हा बहारदार कार्यक्रम रंगणार असून, रसिकांना पारंपरिक लावणीचा आस्वाद घेता येणार आहे.
गुरुवार दि. २६ रोजी सकाळी ९.३० वाजता स्तंभावर लाट चढविणे, दुपारी १२ ते १ या वेळेत कै. कृष्णा राजाराम इंगवले यांच्या स्मरणार्थ अक्षप्रसाद, दुपारी २ ते ४ या वेळेत पंचक्रोशीतील ग्रामदेवतांच्या पालख्यांचे आगमन, खडपोली-दक्षिण विभागातील श्री सुकाईदेवी, गाणे येथील श्री केदारनाथ तसेच मोरवणे येथील श्री केदारनाथ यांच्या पालख्या यात्रेत सहभागी होणार आहेत. सायंकाळी ४ ते ५ या वेळेत लाटेची प्रदक्षिणा व लाट फिरविण्याचा कार्यक्रम होईल. त्यानंतर सायंकाळी ५ ते ५.३० या वेळेत सर्व ग्रामदेवतांच्या पालख्यांचे विधिवत यथासांग पूजन व ओटी भरण्याचा सोहळा पार पडणार आहे. सायंकाळी ५.३० ते ६ या वेळेत यात्रेची सांगता करण्यात येणार असून, उपस्थित ग्रामदेवतांच्या पालख्यांना सन्मानपूर्वक निरोप देण्यात येईल.
इतर उपक्रमांची मेजवानी
यात्रेनिमित्त खुल्या गटातील कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा रविवार दिनांक २२ ते २४ मार्चदरम्यान होतील. तसेच महिलांसाठी खास ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाचे आयोजन मंगळवार दि. २४ मार्च रोजी करण्यात आले आहे. या कार्यक्रमात अभिनेते सिद्धेश उटकर यांची उपस्थिती राहणार आहे.
भक्तांसाठी आवाहन
या यात्रेमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, ग्रामस्थांसह भाविकांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे. या चैत्रोत्सव यात्रेत सहभागी होऊन धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री कान्होबा काळीश्री झोलाई देवस्थानचे अध्यक्ष रुपेश इंगवले यांनी केले आहे.












