WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

नारायण तलाव येथे नमाज पठण केल्याने वाद


नारायण तलाव येथे नमाज पठण केल्याने वाद

समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना आक्रमक

कारवाईसाठी नगराध्यक्ष,पोलिसांना निवेदन

चिपळूण : चिपळूण नगर परिषदेच्या अखत्यारीतील नारायण तलाव येथे ३० जानेवारी रोजी सायंकाळी मुस्लिम समाजातील काही महिला व पुरुषांनी नमाज पठण केल्याचा प्रकार घडला. ही जागा सार्वजनिक असून येथे अशा प्रकारची धार्मिक कृती करू नये, असे उपस्थित नागरिकांनी सांगितले असतानाही संबंधितांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेवर संताप व्यक्त करत आज चिपळूणमधील समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी एकत्र येत नगराध्यक्ष उमेश सकपाळ व पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांना निवेदन सादर केले. संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतल्यानंतर सार्वजनिक ठिकाणी धार्मिक कृती करणे हा गुन्हा ठरू शकतो, त्यामुळे या प्रकरणात कारवाईसाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले. हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने सांगण्यात आले की, नारायण तलाव हा नगर परिषदेच्या अखत्यारीतील सार्वजनिक परिसर असून तेथे जाणीवपूर्वक नमाज पठण करण्यासाठी साहित्य घेऊन येणे ही कृती पूर्वनियोजित असल्याचे दिसून येते. या घटनेमुळे शहरात धार्मिक तणाव निर्माण होऊन सामाजिक शांतता बिघडवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपही करण्यात आला.

याशिवाय, त्या वेळी नगर परिषदेचा वॉचमन उपस्थित होता का, त्याने संबंधितांना का रोखले नाही, याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. नगर परिषद प्रशासन या प्रकाराबाबत जबाबदार असून तातडीने पोलिसांकडे तक्रार दाखल करावी, अन्यथा संघटनांकडून आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला.

यानंतर संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी चिपळूण पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांची भेट घेऊन या प्रकरणात गुन्हा नोंदवण्यात यावा, अशी मागणी केली. या घटनेच्या निषेधार्थ शहरातील धर्माभिमानी हिंदू नागरिक मोठ्या संख्येने नगरपालिकेत उपस्थित राहून जय श्रीरामच्या घोषणा देत या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला.


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!