WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

चिपळूणात प्रथमच स्वतंत्र इलेक्ट्रिक वाहन गॅरेज


चिपळुणात प्रथमच इलेक्ट्रिक वाहनांसाठी स्वतंत्र गॅरेज

स्वामी ऑटोमोबाइल्स – ईव्ही गॅरेज चे थाटात उद्घाटन

चिपळूण, ता. २ ः पर्यावरणपूरक व इंधन बचतीच्या दृष्टीने इलेक्ट्रिक वाहनांचा वापर दिवसेंदिवस वाढत असताना चिपळूण शहरात आजवर स्वतंत्र व सुसज्ज इलेक्ट्रिक वाहन गॅरेज उपलब्ध नव्हते. परिणामी इलेक्ट्रिक वाहनधारकांना वाहन दुरुस्ती, सर्व्हिसिंग तसेच तांत्रिक बिघाडासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. ही बाब लक्षात घेऊन तरुण उद्योजक कुंदन शेट्ये यांनी चिपळूण येथील विरेश्वर कॉलनी या मध्यवर्ती भागात स्वामी ऑटोमोबाइल्स – ईव्ही गॅरेजची स्थापना करून शहरातील इलेक्ट्रिक वाहनधारकांना मोठा दिलासा दिला आहे.

या अत्याधुनिक ईव्ही गॅरेजचे उद्घाटन नगरसेवक व बांधकाम सभापती कपिल शिर्के यांच्या शुभहस्ते फीत कापून करण्यात आले. याप्रसंगी कळंबोली स्टीलचे उपाध्यक्ष प्रबोध शिर्के, श्री मीडिया चे राहुल सूर्यवंशी, सुबोध महाकाल, सचिन खानविलकर, सुयोग लिंगायत, विकास भोजने, शशिकांत दात्ये, गणेश संसारे, सायली शेट्ये व मृणालीनी शेट्ये यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी, इलेक्ट्रिक वाहनधारक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक करून तरुण उद्योजकाच्या धाडसी निर्णयाबद्दल अभिनंदन केले.

स्वामी ऑटोमोबाइल्स – ईव्ही गॅरेज हे केवळ पारंपरिक गॅरेज न राहता इलेक्ट्रिक वाहनांसाठी सर्वसमावेशक सेवा देणारे केंद्र ठरणार आहे. येथे इलेक्ट्रिक दुचाकी व इतर ईव्ही वाहनांचे नियमित सर्व्हिसिंग, तपासणी व दुरुस्ती केली जाणार आहे. विशेष म्हणजे, केवळ मेकॅनिकल कामापुरते मर्यादित न राहता इलेक्ट्रिक वाहनांचे अत्यंत महत्त्वाचे घटक जसे की ईव्ही मोटर, लिथियम बॅटरी, बीएमएस (Battery Management System), एमसीयू (Motor Control Unit) आणि ईसीयू (Electronic Control Unit) यांचे तज्ञ पातळीवर रिपेअरिंग करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनधारकांना आता मोठ्या शहरांकडे धाव घ्यावी लागणार नाही.

उद्घाटनप्रसंगी उद्योजक कुंदन शेट्ये म्हणाले, “इलेक्ट्रिक वाहनांचा वापर झपाट्याने वाढत असून या वाहनांसाठी स्थानिक पातळीवर विश्वासार्ह व तांत्रिकदृष्ट्या सक्षम सर्व्हिस सुविधा उपलब्ध असणे अत्यंत आवश्यक होते. हीच गरज ओळखून स्वामी ऑटोमोबाइल्स – ईव्ही गॅरेज सुरू केले. दर्जेदार सेवा, पारदर्शक कामकाज व योग्य दरात दुरुस्ती देणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.” येत्या काळात ऑन-स्पॉट सर्व्हिस व तात्काळ रिपेअरिंग सुविधा सुरू करण्यात येणार आहे.
उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून या उपक्रमाचे कौतुक केले. “काळाची गरज ओळखून तरुणांनी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित उद्योग सुरू करणे ही निश्चितच अभिमानाची बाब आहे. या गॅरेजमुळे चिपळूण शहर व परिसरातील इलेक्ट्रिक वाहनधारकांना मोठा फायदा होणार आहे,” अशी प्रतिक्रिया मान्यवरांनी व्यक्त करून कुंदन शेट्ये यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

चिपळूणमधील इलेक्ट्रिक वाहनधारकांसाठी स्वामी ऑटोमोबाइल्स – ईव्ही गॅरेज हे एक विश्वासार्ह, सोयीचे व आधुनिक सेवा केंद्र ठरणार असून, भविष्यात इलेक्ट्रिक वाहन क्षेत्राच्या वाढीस चालना देणारे हे केंद्र ठरेल, असा विश्वास उपस्थित नागरिकांनी व्यक्त केला.


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!