एस.टी बसने क्रेटा कारला फरफटत नेले
चिपळूण बुरुमतळी येथे भीषण अपघात
चिपळूण : शहरातील बुरुमतळी परिसरात आज दुपारी सुमारे 3 वाजताच्या सुमारास एसटी बस आणि क्रेटा कार यांच्यात भीषण अपघात झाला. पाग परिसराकडून येणाऱ्या हडकणी–चिपळूण एसटी बसने समोरून धडक देत क्रेटा कारला काही अंतर फरफटत नेल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

हा अपघात चिंचनाका ते पाग पॉवर हाऊस मुख्य रस्त्यावर घडला. धडकेनंतर क्रेटा कारचा मागील भाग रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारात जाऊन अडकला, तर कारच्या दर्शनी भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
अपघातानंतर काही वेळासाठी या मार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली. घटनेची माहिती मिळताच चिपळूण पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.

सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही, ही दिलासादायक बाब आहे. दरम्यान, अपघातग्रस्त क्रेटा कार ही मिरजोळी येथील दलवाई यांची असल्याचे समजते. पुढील तपास पोलीस करत आहेत.










