स्वबळावर लढत काँग्रेसचा तीन जागांवर विजय
जिल्हाध्यक्षा सोनललक्ष्मी घाग यांच्या उपस्थितीत जल्लोष
चिपळूण : चिपळूण नगर परिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षाने स्वबळावर लढत तीन नगरसेवकांच्या जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. प्रतिकूल राजकीय परिस्थिती, मर्यादित संसाधने आणि तीव्र स्पर्धा असतानाही काँग्रेसने आपली राजकीय प्रतिष्ठा आणि अस्तित्व कायम राखत ताकद दाखवून दिली आहे.
या निवडणुकीत जिल्हाध्यक्षा सोनललक्ष्मी घाग यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने सुरुवातीपासूनच महाविकास आघाडीची भूमिका मांडली होती. मात्र, वारंवार काँग्रेसला डावलले जात असल्याचा आरोप करत अखेर पक्षाने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. ‘स्वबळाचा नारा’ देत मैदानात उतरलेल्या काँग्रेसला या निर्णयाचा सकारात्मक फायदा झाला असल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे.
या निवडणुकीत दिग्गज उमेदवारांच्या चुरशीच्या लढतीत काँग्रेसचे सफा गोटे, साजिद सरगुरोह आणि मिसबा नाखुदा हे तीन उमेदवार विजयी झाले. स्वबळावर लढून मिळालेला हा विजय चिपळूणच्या राजकारणात काँग्रेसचे महत्त्व अधोरेखित करणारा मानला जात आहे.
निवडणूक काळात काँग्रेसमध्ये अंतर्गत बंडखोरी झाल्याने काही प्रमाणात पक्षाचे नुकसान झाले असले, तरीही पक्षाने मैदान न सोडता संघर्ष सुरू ठेवला. या कठीण परिस्थितीत मिळालेला तीन जागांचा विजय काँग्रेससाठी आत्मविश्वास वाढवणारा आणि आगामी राजकारणासाठी दिशा देणारा ठरत आहे.
या विजयाच्या पार्श्वभूमीवर चिपळुणात काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. जिल्हाध्यक्षा सोनललक्ष्मी घाग यांच्या उपस्थितीत फटाक्यांची आतषबाजी, घोषणाबाजी आणि अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला. कार्यकर्त्यांमध्ये नव्या उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.












