WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

जिल्हा परिषदेवर ‘रेकॉर्ड ब्रेक’ भगवा फडकेल : सदानंद चव्हाण


जिल्हा परिषदेवर ‘रेकॉर्ड ब्रेक’ भगवा फडकेल : सदानंद चव्हाण

चिपळुणातील जाहीर सभेत व्यक्त केला ठाम विश्वास

चिपळूण : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक अंतिम टप्प्यात आली असून या निवडणुका खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. कार्यकर्त्यांच्या पाठीशी कसे उभे राहायचे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कृतीतून दाखवून दिले आहे. नगर पालिका निवडणुकीत त्यांचे चिपळुणात आगमन झाले आणि नगराध्यक्षासह युतीची सत्ता आली. आज पुन्हा ते कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी इथपर्यंत आले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेवर नक्कीच ‘रेकॉर्ड ब्रेक’ भगवा फडकेल, असा ठाम विश्वास शिवसेना उपनेते तथा माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी व्यक्त केला. चिपळुणातील महायुतीच्या जाहीर सभेत ते बोलत होते.

यावेळी त्यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा दौरा पूर्वनियोजित नव्हता, अचानक ठरला. मात्र त्यामागचा उद्देश एकच आहे, ते म्हणजे चिपळूणवरचे प्रेम आणि कार्यकर्त्यांप्रती असलेली बांधिलकी.

कार्यकर्त्यांमुळेच नेतृत्व घडते
सदानंद चव्हाण म्हणाले, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. याच कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे पुढे आमदार, मंत्री, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घडतात. त्यामुळे अशा निवडणुकीत नेतृत्वाने प्रत्यक्ष सहभागी होणे आवश्यक आहे. त्याच भावनेतून आज शिंदे साहेब चिपळुणात आले आहेत.

नगरपालिकेत भगवा फडकला, आता जिल्हा परिषदेतही विजय निश्चित
नगरपालिका निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीचा भगवा फडकवण्याची गेल्या अनेक वर्षांची प्रतीक्षा होती. ती शिंदे साहेबांच्या आगमनाने पूर्ण झाली. त्यांच्या पावलांनी चिपळूणमध्ये उत्साह संचारला आणि ती लढाई आम्ही जिंकलो, असे त्यांनी सांगितले. महापुराच्या काळात नगरविकास मंत्री, मुख्यमंत्री आणि आता उपमुख्यमंत्री म्हणून शिंदे यांनी चिपळूणसाठी केलेले काम आजही नागरिकांच्या स्मरणात आहे. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे आणि महायुतीवर जनतेचा विश्वास असल्यामुळे नगरपालिकेत नगराध्यक्षासह सत्ता मिळाली, असेही त्यांनी नमूद केले.

1997 पासून जिल्हा परिषदेत भगवा; यावेळी ‘रेकॉर्ड ब्रेक’
रत्नागिरी जिल्हा परिषदेवर 1997 पासून सातत्याने भगवा फडकत आहे. यावेळी तर रेकॉर्ड ब्रेक विजय मिळेल, असा विश्वास सदानंद चव्हाण यांनी व्यक्त केला. शिवसेना-भाजप-आरपीआय महायुती भक्कम असून पालकमंत्री उदय सामंत आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या खंबीर साथीने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्व जागा जिंकू, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पुन्हा ताकदीने उभी
चिपळुणात पूर्वीची जशी शिवसेना होती, तशीच आज शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली पुन्हा ताकदीने उभी राहत आहे, असेही त्यांनी अभिमानाने सांगितले.

सभेला नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती
या सभेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री उदय सामंत, गृहराज्यमंत्री योगेश कदम, शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, भाजप नेते प्रशांत यादव, नगराध्यक्ष उमेश सकपाळ, उपनगराध्यक्ष रुपाली दांडेकर, भाजप जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, सौ. स्वप्ना यादव, भाजप तालुकाध्यक्ष विनोद भुरण, आरपीआय तालुकाध्यक्ष प्रशांत मोहिते, वसंतदादा उदेग, बाळकृष्ण जाधव, शिवसेना तालुकाप्रमुख संदेश उर्फ बापू आयरे, रुपेश घाग, राकेश शिंदे, दिलीप चव्हाण, नगरसेवक निहार कोवळे, अंकुश आवले, शशिकांत मोदी यांच्यासह अनेक पदाधिकारी, उमेदवार व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


595
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!