WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

सहा कंपन्या बंद करा, अन्यथा आम्ही येथून हलणार नाही!


सहा कंपन्या बंद करा, अन्यथा आम्ही येथून हलणार नाही!

🔴प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या चिपळूण कार्यालयावर सोनगाव ग्रामस्थांचा आक्रमक मोर्चा

🔴अधिकाऱ्यांना धारेवर धरत तीव्र घोषणाबाजी

चिपळूण, ता. २७ : लोटे एमआयडीसीमधील कंपन्यांकडून कथितपणे सोडण्यात येणाऱ्या घातक रासायनिक सांडपाण्यामुळे संतप्त झालेल्या खेड तालुक्यातील सोनगाव ग्रामस्थ व विविध संघटना यांनी सोमवारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (एमपीसीबी) चिपळूण येथील प्रादेशिक कार्यालयावर धडक मोर्चा काढत प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. “सहा प्रदूषणकारी कंपन्यांना तात्काळ टाळे ठोका, अन्यथा आम्ही येथून हलणार नाही,” असा इशारा देत ग्रामस्थांनी कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी केली. प्रशासनाकडून वारंवार आश्वासने मिळूनही प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई न झाल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

सोनगावमधून वाहणाऱ्या ओढ्यात लोटे एमआयडीसीतील कंपन्यांकडून वारंवार दूषित रासायनिक सांडपाणी सोडले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यासंदर्भात अनेक वेळा निवेदने देण्यात आली, अधिकाऱ्यांच्या भेटी घेण्यात आल्या आणि प्रदूषणाच्या गंभीर परिणामांकडे लक्ष वेधण्यात आले. मात्र, त्यानंतरही परिस्थितीत कोणताही बदल झालेला नसल्याने ग्रामस्थांचा संताप शिगेला पोहोचला.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, ७ जुलै रोजी अत्यंत घातक रासायनिक सांडपाणी ओढ्यात सोडण्यात आले, ज्यामुळे परिसरातील पर्यावरणावर गंभीर परिणाम झाला. वर्षानुवर्षे सुरू असलेल्या या प्रदूषणामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून, मच्छीमारी व्यवसाय जवळपास संपुष्टात आला आहे. तसेच दुग्धव्यवसायावरही विपरीत परिणाम झाल्याने अनेक कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

प्रदूषणाच्या विरोधात सातत्याने आवाज उठवूनही प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने सोनगाव ग्रामपंचायत आणि समस्त ग्रामस्थांनी थेट एमपीसीबी कार्यालयावर मोर्चा नेण्याचा निर्णय घेतला. मोर्चादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. परकर कॉम्प्लेक्सच्या प्रवेशद्वाराजवळ मोठ्या संख्येने ग्रामस्थ जमा झाले आणि “आश्वासने नकोत, कारवाई करा”, “प्रदूषण करणाऱ्या कंपन्या बंद करा” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

या आंदोलनात आमदार भास्कर जाधव, माजी खासदार हुसेन दलवाई, काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सोनललक्ष्मी घाग, सामाजिक कार्यकर्ते भरत लब्धे, शिवसेनेचे विभागप्रमुख राजू घाग, उपसरपंच मिलिंद घोरपडे, पंचायत समिती सदस्या रेवती घाग, संदीप घाग, दिलीप घाग, नारायण पवार, नामदेव घाग, विष्णू साळुंखे यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी, ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

‘सहा कंपन्यांना टाळे ठोका’ची ठाम मागणी

मोर्चादरम्यान ग्रामस्थांनी अनेक महत्त्वाच्या मागण्या प्रशासनासमोर ठेवल्या. ‘ए’ संपमधील दोषी कंपन्यांचे उत्पादन तात्काळ बंद करण्यात यावे, रासायनिक प्रदूषणामुळे शेतकरी, मच्छीमार आणि व्यावसायिकांचे झालेले नुकसान संबंधित कंपन्यांकडून भरून काढावे, प्रदूषण तपासणीचे सर्व अहवाल ग्रामस्थांना त्वरित उपलब्ध करून द्यावेत आणि प्रदूषणास जबाबदार असलेल्या सहा कंपन्यांवर कठोर कारवाई करून त्यांना टाळे ठोकावे, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.

अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार

मोर्चाच्या पार्श्वभूमीवर उपप्रादेशिक अधिकारी श्रीपाद कुलकर्णी यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. त्यांनी, “निवेदनाबाबतचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला असून, समस्यांच्या निराकरणासाठी दोन दिवसांचा अवधी द्यावा,” अशी विनंती केली.

मात्र या स्पष्टीकरणाने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. “आतापर्यंत नेमकी कोणती कारवाई केली? निवेदने देऊन इतके दिवस झाले तरी दोषींवर कारवाई का नाही? वारंवार आश्वासने देऊन आमच्या डोळ्यात धूळफेक का केली जाते?” असे सवाल करत ग्रामस्थांनी निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला.

सोनगावच्या प्रदूषणाचा प्रश्न आता केवळ पर्यावरणाचा न राहता ग्रामस्थांच्या अस्तित्वाशी निगडित बनला असून, प्रशासन पुढील दोन दिवसांत नेमकी कोणती भूमिका घेते, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!