WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आज रत्नागिरीत


भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आज रत्नागिरीत

‘ऑपरेशन कमळ’ची जय्यत तयारी

रत्नागिरी : भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आता रत्नागिरी जिल्ह्याकडे लक्ष केंद्रित केले असून पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद घेतल्यानंतर आता दुसऱ्यांदा ते रत्नागिरीत येत असून यावेळी पक्ष बांधणीसह ‘ऑपरेशन कमळ’ची जय्यत अशी तयारी देखील करण्यात आली आहे. त्यामुळे आ. रवींद्र चव्हाण यांच्या या दौऱ्याकडे विरोधी पक्षाचे लक्ष लागले आहे. साहजिकच प्रदेशाध्यक्ष आ.रवींद्र चव्हाण यांचा हा दौरा भाजपला बळ देणारा ठरणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात अत्यंत झपाट्याने भारतीय जनता पार्टीचा विस्तार होऊ लागला आहे. रत्नागिरी दक्षिणची जबाबदारी प्रशांत यादव यांच्याकडे तर उत्तरची जबाबदारी सतीश मोरे अशा तरुण नेतृत्वाकडे देऊन भारतीय जनता पार्टीने रत्नागिरी जिल्ह्यात पक्ष विस्ताराला नवीन मार्ग मोकळा करून दिला आणि या दोन्ही जिल्हाध्यक्षांनी पक्षाचा हा विश्वास आतापर्यंत सार्थ ठरवला आहे. प्रदेश कडून वेळोवेळी येणारे पक्षाच्या कार्यक्रमाची काटेकोर अंमलबजावणी करून त्याचा सत्य अहवाल पक्षश्रेष्टीपर्यंत पोहचवल्याने प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे देखील त्यांच्यावर खुश असल्याचे वेळोवेळी दिसून येत आहे.

दरम्यान भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते प्रमोद जठार यांना थेट विधान परिषदेची आमदारकी देऊन पक्षाने सिंधुदुर्गसह रत्नागिरी जिल्ह्यात देखील भाजप कार्यकर्त्याना एक प्रकारे बळ दिले असल्याने कार्यकर्ते देखील नव्या उत्साहाने कामाला लागले आहेत. आ.प्रमोद जठार यांच्यासह पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्याकडे देखील कोकणची जबाबदारी देण्यात आली आहे. तर नामदार नितेश राणे यांच्याकडे रत्नागिरीचे संपर्कमंत्री म्हणून जबाबदारी देऊन भारतीय जनता पार्टीने रत्नागिरी जिल्ह्यात मजबुतीने आपले पाय रोवण्यास सुरुवात केली असल्याचे स्पष्ट चित्र या निमित्ताने दिसून येत आहे. अर्थात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या दूरदृष्टी राजकीय नेतृत्वाचे हे फलित असल्याचे बोलले जात आहे.

प्रदेशाध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर आम.रवींद्र चव्हाण आता दुसऱ्यांदा रत्नागिरीत येत आहेत. यापूर्वीचा त्यांचा पहिला दौरा काही कारणास्तव अर्धवट राहिला होता. त्यामुळे यावेळी अत्यंत भरीव असा कार्यक्रम त्यांच्या नेतृत्वाखाली अयोजियत करण्यात आला आहे. रत्नागिरी दक्षिण व रत्नागिरी उत्तर असे दोन्ही कार्यकारणी व पदाधिकारी बैठक तसेच कार्यकर्ता मेळावा देखील आयोजित करण्यात आला आहे. प्रदेशाध्यक्ष म्हणून प्रथमच संपूर्ण जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ते एकत्र मार्गदर्शन करणार असल्याने आपल्या मार्गदर्शनातून ते कोणता ‘कानमंत्र’ कार्यकर्त्यांना देणार याकडे राजकीय वर्तुळाच्या नजरा राहणार आहेत.

आ. रवींद्र चव्हाण यांची एक खासियत राहिली आहे ती म्हणजे ते ज्याठिकाणी जातात त्याठिकाणी “राजकीय भूकंप” ठरलेला असतो. यावेळी देखील रत्नागिरीत राजकीय भूकंप होणार असून त्याअनुषंगाने ‘ऑपरेशन कमळ’ची तयारी करण्यात आली आहे. विरोधी पक्षातील काही दिगग्ज नेते व पदाधिकारी आ.रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार आहेत. प्रवेश करणाऱ्यांची यादी मोठी असल्याने विरोधी पक्षाला खिंडार तर भाजप बळ असेच चित्र यावेळी दिसून येणार आहे.आता कोणत्या पक्षाचे कोण नेते व पदाधिकारी प्रवेश करणार हे त्याचवेळी वीर सावरकर सभागृहात पहायला मिळणार असल्याने राजकीय पक्षांच्या नजरा या मेळाव्याकडे लागले आहेत.

पदाधिकारी बैठक, कार्यकर्ता मेळावा आणि पक्षप्रवेश सोहळा अशा या भरगच्च कार्यक्रमाची जय्यत अशी तयारी करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, सतीश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप पदाधिकारी नियोजन करत असून अन्य तालुक्यातून देखील मंगळवारीच कार्यकर्ते रत्नागिरीत दाखल झाले आहेत. जिल्हाध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेले नियोजन आणि कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता रत्नागिरीचे वीर सावरकर नाट्यगृह कमी पडणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे या कार्यक्रमातून रत्नागिरी जिल्ह्यातील भाजपला नवे बळ मिळेल असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.


596
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!