WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

बाळ माने यांचे राजकारण म्हणजे स्वार्थासाठी डबकी बदलण्याचा इतिहास : विनायक राऊत


बाळ माने यांचे राजकारण म्हणजे स्वार्थासाठी डबकी बदलण्याचा इतिहास : विनायक राऊत

मुंबई : विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेऊन बाळ माने यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मतदारांचा विश्वासघात केल्याचा गंभीर आरोप शिवसेना नेते तथा पक्षाचे सचिव व माजी खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. बाळ माने यांचा हा निर्णय अचानक घेतलेला नसून त्यामागे पूर्वनियोजित राजकीय षडयंत्र असल्याचा दावा त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनातून केला.

राऊत यांनी म्हटले आहे की, उमेदवारी अर्ज दाखल करतानाच दुसरा कोणताही डमी उमेदवार उभा राहू नये यासाठी बाळ माने यांनी मोठ्या प्रमाणावर मतदारांच्या सह्या गोळा करून ठेवल्या होत्या. तसेच चार-चार अर्ज दाखल करून इतर संभाव्य पर्याय बंद करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे त्यांच्या मनात सुरुवातीपासूनच वेगळे राजकीय डावपेच सुरू असल्याचे स्पष्ट होते, असे त्यांनी नमूद केले.

बाळ माने यांनी वरिष्ठ नेत्यांनी दाद दिली नसल्याचा दावा केला असला, तरी उमेदवारी मिळवण्यासाठी ते सातत्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात होते. त्यांना प्रत्यक्ष भेटीसाठी बोलावण्यात आले होते, मात्र त्यांनी वेळकाढूपणा केला. त्यामुळे संवाद झाला नाही, हा दावा वस्तुस्थितीला धरून नसल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले.

वैयक्तिक आरोपांवरही पलटवार

स्वतःवरील आरोपांना उत्तर देताना विनायक राऊत यांनी म्हटले की, माझ्यावर वैयक्तिक आरोप करून स्वतःची बेईमानी झाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. पालघर प्रकरण किंवा कार्यकर्त्यांकडून पैसे घेतल्याचे आरोप करणाऱ्यांकडे पुरावे असतील तर त्यांनी ते जाहीर करावेत. शिवसेनेसाठी आयुष्य घालवणाऱ्या कार्यकर्त्यांवर बोट दाखवण्यापूर्वी स्वतःचा राजकीय इतिहास तपासण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच माझ्यावर तथाकथित “रिचार्ज” घेण्याचे आरोप करणाऱ्यांनी प्रथम स्वतः कोणत्या पक्षांशी बेईमानी केली याचे उत्तर द्यावे, असे सांगत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवास करून आता पुन्हा सत्ताधाऱ्यांच्या दिशेने वाटचाल करणाऱ्यांनी निष्ठेबाबत भाष्य करणे हा विनोद असल्याची टीका त्यांनी केली.

उमेदवारीलाच होता विरोध

राऊत यांनी दावा केला की, विधानसभा निवडणुकीत बाळ माने यांना उमेदवारी देण्यास त्यांचा सुरुवातीपासूनच विरोध होता. तत्कालीन जिल्हाप्रमुख विलास चाळके यांच्यासह त्यांनी उदय बने हे अधिक सक्षम व निष्ठावंत उमेदवार ठरतील, अशी भूमिका पक्षप्रमुखांसमोर मांडली होती. आज घडलेल्या घटनांमुळे त्यांची ती भूमिका योग्य असल्याचे सिद्ध झाले असल्याचे त्यांनी म्हटले. नगरपालिका निवडणुकीतही सक्षम उमेदवारांना संधी न देता स्वतःच्या घरातील उमेदवारांना प्राधान्य देण्यात आले आणि त्यामुळे महाविकास आघाडीला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे त्यांच्या कार्यपद्धतीबाबत पक्षात पूर्वीपासूनच नाराजी होती, असा दावाही त्यांनी केला.

आर्थिक व्यवहारांबाबत प्रश्नचिन्ह

बाळ माने यांनी अर्ज मागे घेतल्यानंतर काही सत्ताधारी नेत्यांसोबत त्यांची उपस्थिती, विशेष विमान प्रवास तसेच निवडणूक बिनविरोध करण्यासाठी कथित आर्थिक व्यवहार झाल्याच्या चर्चांमुळे जनतेच्या मनात गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचे राऊत यांनी म्हटले. संपूर्ण कोकण आणि महाराष्ट्रात या संदर्भातील चर्चांना उधाण आले असून पैशाच्या जोरावर लोकशाही प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याचे प्रकार चिंताजनक असल्याचे त्यांनी नमूद केले.

“एकटे आले, एकटेच गेले”

पक्षप्रवेशाला विरोध केल्याचा आरोप फेटाळून लावताना राऊत म्हणाले की, त्यांचा विरोध व्यक्तीला नव्हता तर बाळ माने यांच्या राजकीय प्रवृत्तीला आणि निष्ठेबाबत असलेल्या शंकांना होता. संधी मिळाल्यानंतर ते पुन्हा राजकीय उडी मारतील, अशी भीती होती आणि आज नेमके तेच घडल्याचा दावा त्यांनी केला. शेकापला उमेदवारी देण्याचा निर्णय असो किंवा पक्षातील इतर प्रश्न, त्यावर पक्षांतर्गत चर्चा करण्याचे अनेक मार्ग उपलब्ध होते. मात्र अर्ज मागे घेऊन पक्षालाच अडचणीत आणण्याचा मार्ग निवडण्यात आल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. शिवसेनेचे नुकसान झाल्याचा दावा केला जात असला तरी बाळ माने पक्षात आले तेव्हा एकटे आले होते आणि आजही एकटेच गेले आहेत. त्यांच्यासोबत शिवसैनिक गेलेले नाहीत. शिवसेना व्यक्तीवर नव्हे तर विचार आणि निष्ठेवर उभी आहे, असे राऊत यांनी स्पष्ट केले.

निष्ठावंत शिवसैनिकांच्या बळावर शिवसेना अधिक मजबूत होईल

राज्यात पैशाचे, दबावाचे आणि राजकीय दलालीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होत असला तरी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना निष्ठावंत शिवसैनिकांच्या बळावर अधिक जोमाने उभी राहील, असा विश्वास विनायक राऊत यांनी व्यक्त केला. स्वार्थासाठी डबकी बदलणाऱ्यांमुळे शिवसेना थांबणार नाही, उलट अशा घटनांमुळे निष्ठा आणि विश्वासाचे महत्त्व अधिक अधोरेखित होईल, असे त्यांनी शेवटी म्हटले.


596
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!