वादळ-वाऱ्यातही सामाजिक बांधिलकी जपली
मोरोशी येथे प्रतिकूल परिस्थितीत आरोग्य शिबीर उत्साहात
राजापूर : अवकाळी पाऊस, जोरदार वादळी वारे आणि विस्कळीत झालेल्या जनजीवनाच्या पार्श्वभूमीवरही सामाजिक बांधिलकी जपत मोरोशी (ता. राजापूर) येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर यशस्वीपणे पार पडले. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय रत्नागिरी तसेच श्रीकृष्ण महिला बालकल्याण व अपंग पुनर्वसन विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमाला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

शिबिराच्या आदल्या रात्री मोरोशी परिसरात अवकाळी पावसासह जोरदार वादळाने थैमान घातले होते. अनेक ठिकाणी वीज खांब कोसळले, पाणीपुरवठा खंडित झाला तर गावातील संपर्क व्यवस्था देखील विस्कळीत झाली होती. अशा कठीण परिस्थितीतही ग्रामस्थांनी मोठ्या मनाने सहकार्य करत सामाजिक कार्याला प्राधान्य दिले. त्यामुळे शिबिर यशस्वीरीत्या पार पडले.

श्री गुंडीबाई चॅरिटेबल ट्रस्ट, मोरोशी गावकरवाडी यांच्या सहकार्याने आयोजित या शिबिरात श्री स्वामी समर्थ रुग्णालय, लांजा येथील डॉ. सुहास खानविलकर व त्यांच्या टीमने तसेच श्री स्वामी समर्थ नेत्र रुग्णालयाचे डॉ. सुहास देसाई व त्यांच्या टीमने आरोग्य सेवा दिली. शिबिरामध्ये १२३ रुग्णांची तपासणी करण्यात आली असून काही रुग्णांची पुढील शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली.
यावेळी योगा शिबीर, विविध स्पर्धा व जनजागृतीपर कार्यक्रमांनाही चांगला प्रतिसाद मिळाला. ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत अशा प्रकारचे आरोग्य उपक्रम गावात सातत्याने व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.
शिबिराचे नियोजन शशिकांत चव्हाण यांनी केले. “रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा” असे सांगत त्यांनी ग्रामीण भागात आरोग्य सेवा पोहोचविण्याचा संकल्प व्यक्त केला. भविष्यातही मोफत आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
या उपक्रमाबद्दल ग्रामस्थांनी श्री गुंडीबाई चॅरिटेबल ट्रस्ट, ग्रामपंचायत मोरोशी तसेच सहभागी डॉक्टर, आरोग्य कर्मचारी व सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.











