WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

‘आपलं चिपळूण’च्या अध्यक्षपदी डॉ. यतिन जाधव


‘आपलं चिपळूण’च्या अध्यक्षपदी डॉ. यतिन जाधव

संस्थेच्या नवीन कार्यकारिणीची निवड

चिपळूण : चिपळूण शहरात २०१२ सालापासून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व पर्यावरणपूरक उपक्रमांसाठी ओळखली जाणारी सर्वस्पर्शी संस्था म्हणजे आपलं चिपळूण… प्रसिद्धीपासून दूर राहून निःस्वार्थ भावनेने काम करणे हे या संस्थेचे वैशिष्ट्य राहिले आहे. शिक्षण, कला, क्रीडा, आरोग्य शिबिरे, निराधार व्यक्तींना मदत, निसर्ग संवर्धन, प्राणी-पक्षी संरक्षण, शहर सुशोभीकरण व विकास प्रकल्प तसेच दुर्गम भागातील विद्यार्थी व निराधार वृद्धांना सहाय्य अशा विविध उपक्रमांत संस्था सातत्याने योगदान देत आहे. अशा या संस्थेची नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली असून अध्यक्षपदी डॉ. यतिन जाधव यांची एकमुखी निवड करण्यात आली.

दि. ९ मे रोजी खेंड, चिपळूण येथील स्प्रिंग क्लिनिक मधील संस्थेच्या अधिकृत कार्यालयात वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. या बैठकीत येत्या वर्षातील उपक्रमांचा सविस्तर आराखडा तयार करून त्यासाठी कृती आराखडा निश्चित करण्यात आला. चिपळूण शहराच्या विकासासाठी लवकरच तालुक्यातील लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरणप्रेमी व नदी-नाले संवर्धन कार्यकर्त्यांसोबत वैयक्तिक व सार्वजनिक चर्चासत्र आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

संस्थेच्या माध्यमातून कोकणातील परंपरा व संस्कृतीवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम, आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, पुस्तकांची रोटेशन पद्धती, गुणवंत विद्यार्थ्यांमार्फत मार्गदर्शन शिबिरे, गड-किल्ले भ्रमंती, पशु-पक्षी निरीक्षण, वृक्षलागवड, वन विभाग व निसर्गप्रेमींसोबत कार्बन क्रेडिट योजनेबाबत जनजागृती तसेच आरोग्य, मनःशांती, निसर्गोपचार, ध्यान-मानसोपचार यांसारख्या विषयांवर उपक्रम राबविण्याचा मनोदय व्यक्त करण्यात आला.

बैठकीच्या शेवटी गेल्या १४ वर्षांत कार्यभार सांभाळणाऱ्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानण्यात आले. मावळते अध्यक्ष उदय ओतारी यांनी पुढील पाच वर्षांसाठी नव्या कार्यकारिणीची घोषणा केली.

नवीन कार्यकारिणीमध्ये अध्यक्ष – डॉ. यतिन जाधव, कार्याध्यक्षपदी – श्री.संतोष देशमुख , उपाध्यक्ष – श्री. प्रशांत पाटेकर आणि श्री. मनोज जाधव, सचिव – श्री. उदय ओतारी, सहसचिव – श्री.प्रशांत देवळेकर, खजिनदार – श्री.फैय्याज देसाई, सहखजिनदार – श्री.राजू दरेकर, कार्यकारणी सदस्य – श्री. जितेंद्र सुर्वे,श्री.निहार जोशी, श्री.मंगेश गोंधळेकर, श्री.प्रसन्न आवले,श्री.विशाल जानवलकर आदींचा समावेश करण्यात आला.

ही संस्था महाराष्ट्र धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे नोंदणीकृत असून लवकरच महिला व पुरुष सर्वसाधारण सभासदांची निवड करण्यात येणार असल्याची माहिती विद्यमान सचिव उदय ओतारी यांनी दिली.


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!