चिपळूण : ग्रामपंचायत ही ग्रामीण भागातील विकासाचा केंद्रबिंदू आहे. नविन इमारतीमुळे गावकारभार अधिक सक्षम आणि पारदर्शक होईल. येथे ग्रामस्थांसाठी उत्तम सुविधा निर्माण होतील आणि सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवण्यास वेग येईल. मी शब्द दिला आणि सहा महिन्यात इमारत उभी राहिली, यात समाधान असल्याची भावना आमदार शेखर निकम यांनी नांदिवसे ग्रामपंचायत इमारत उदघाटन प्रसंगी व्यक्त केली.
गावाच्या विकासासाठीचा आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठत, नांदिवसे येथील निर्मल ग्रुप ग्रामपंचायती नव्या इमारतीचा उदघाटन सोहळा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. आमदर शेखर निकम तसेच माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्या हस्ते इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार शेखर निकम म्हणाले, २०२१ च्या अतिवृष्टीत गावात अनेक ठिकाणी नुकसान झाले. काही ठिकाणी पुल वाहून गेल्याने गावाचा संपर्क तुटला. त्यानंतर पुलाचे काम मजूर करून उदघाटन झाले तो क्षण आजही लक्षात आहे. आमदारकीच्या काळात अनेक विकासकामे करण्याची संधी मिळाली. त्यामध्ये प्रसिद्ध कालभैरव मंदिराचे रस्त्याचे काम सुद्धा महत्वाचे होते.
यानंतर माजी आमदार सदानंद चव्हाण यांनीही गावात अनेक कामे केल्याचे सांगितले. कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवरांनी आपल्या मनोगतातून नांदिवसे गावाच्या प्रगतीच्या वाटचालीला शुभेच्छा दिल्या. ग्रामपंचायतीच्या नव्या इमारतीसाठी केलेल्या सहकार्याचे कौतुक केले. संपूर्ण कार्यक्रम एकतेचा, सहभागाचा आणि विकासाच्या नव्या पर्वाचा प्रतीक ठरला. यावेळी अशोकभाई कदम, निहार कोवळे, दिनेश शिंदे, सरपंच सायली शिंदे, उपतालुका प्रमुख संजय गणवे, ज्येष्ठ नागरिक जयवंत राव शिंदे, रमेश शिंदे, भरतराव शिंदे, रमेश शिंदे, दयानंद शिंदे, नीता पाड्याळ, नरसिंगराव शिंदे, शशिकांत शिंदे, शंकरराव शिंदे, प्रकाश शिंदे, श्रीकांत शिंदे, सुनील शिंदे, वैदही शिंदे, अशोक कदम, अनिकेत शिंदे, वैशाली मोडक, सरकारी कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.












