वारसा संघर्षाचा… वसा जनसेवेचा !
उमेदवार पत्नीसाठी संदीप सावंत यांची जनतेला साद
चिपळूण : “मी आयुष्यभर केलेला संघर्ष हा स्वतःसाठी, कुटुंबासाठी किंवा कोणताही स्वार्थ साधण्यासाठी नव्हता. माझा प्रत्येक संघर्ष हा सर्वसामान्य जनतेसाठी, गोरगरीब, दिनदुबळे आणि वंचित घटकांच्या न्यायहक्कासाठी होता,” असे भावनिक उद्गार सामाजिक कार्यकर्ते संदीप सावंत यांनी काढले.

समाजातील प्रत्येक घटकाला आपले कुटुंब मानून त्यांच्या समस्या, दुःख, अडचणी सोडवण्यासाठी आपण नेहमीच रस्त्यावर उतरून लढलो असल्याचे त्यांनी सांगितले. “मी अनेकदा प्रशासनाच्या विरोधात उभा राहिलो, शासनाविरोधात आवाज उठवला. प्रसंगी स्वकीयांशीही संघर्ष केला. अनेकदा गुन्हे अंगावर घेतले, जेलमध्ये जाण्याची वेळ आली, पण मी कधीच मागे हटलो नाही आणि पुढेही हटणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
जात-धर्म न पाहता मदतीचा हात
संदीप सावंत यांनी सांगितले की, “माझ्याकडे जो कोणी आला त्याला मी कधीच जात, धर्म, पक्ष किंवा तो कोणत्या वाडीतील आहे हे विचारले नाही. मी फक्त त्याची गरज पाहिली, त्याची समस्या जाणून घेतली आणि शक्य ते सर्व करण्याची तयारी ठेवली. माझं काय होईल, माझ्या कुटुंबाचं काय होईल याचा तसूभरही विचार केला नाही.” त्यांच्या संघर्षामागे एकच भावना होती, ती म्हणजे समाजातील सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे, त्याच्या समस्या सुटल्या पाहिजेत.
जनसेवेसाठी लोकशाही मार्ग आवश्यक
संदीप सावंत म्हणाले की, संघर्षाला शासन आणि प्रशासनाची साथ मिळणे गरजेचे आहे. लोकशाही मार्गाने व्यवस्थेमध्ये जाऊन काम करणे हा देखील जनसेवेचा महत्त्वाचा मार्ग आहे. त्यामुळे ग्रामीण भागाचा कणा असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये आपला हक्काचा प्रतिनिधी असावा, या उद्देशाने त्यांच्या पत्नी सौ. शिवानी संदीप सावंत या जिल्हा परिषद निवडणुकीत उमेदवार म्हणून मैदानात उतरल्या आहेत.
याचबरोबर वहाळ पंचायत समितीचे उमेदवार संजय सोनू जावळे आणि निवळी पंचायत समितीच्या उमेदवार शर्मिला सोपान देसाई हे देखील जनतेच्या सेवेसाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
ही निवडणूक राजकीय नाही, जनसेवेचा वसा
“ही निवडणूक केवळ राजकीय प्रक्रियेचा भाग नाही, तर जनसेवेचा घेतलेला वसा पुढे घेऊन जाण्याचा मार्ग आहे. माझ्या संघर्षाला प्रशासनाची जोड मिळावी आणि त्या माध्यमातून अधिक भक्कमपणे सेवा करता यावी, हा स्वच्छ आणि प्रामाणिक उद्देश आहे,” असे सावंत यांनी नमूद केले.
पत्नीबद्दल विश्वास आणि शब्दाची हमी
पत्नी शिवानी सावंत यांच्याबाबत बोलताना संदीप सावंत म्हणाले, “ती उच्चशिक्षित आहे, हुशार आहे, सामाजिक क्षेत्राचे भान तिला आहे. आपल्या गावातील व परिसरातील समस्या तिला ज्ञात आहेत. त्यामुळे जनसेवेत ती कुठेही कमी पडणार नाही, हा माझा शब्द आहे.” “ज्याप्रमाणे तिने माझे कुटुंब आणि संसार सांभाळून माझ्या पाठी भक्कमपणे साथ दिली, त्याचप्रमाणे ती आता जनतेच्या पाठी उभी राहील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
७ फेब्रुवारीला मतदानाचे आवाहन
येत्या ७ फेब्रुवारी रोजी धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर मतदान करून सौ. शिवानी संदीप सावंत, वहाळ पंचायत समितीचे उमेदवार संजय सोनू जावळे आणि निवळी पंचायत समितीच्या उमेदवार शर्मिला सोपान देसाई यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले. “पुढील पाच वर्षे मी, माझी पत्नी आणि माझे सहकारी अहोरात्र आपल्या सेवेत तत्पर राहू,” असा शब्द त्यांनी या निमित्ताने जनतेला दिला.










