माजी आमदार सदानंद चव्हाण यांची यशस्वी मध्यस्थी
वेहेळे पं. स. गणातून अपक्ष उमेदवार संजय जाबरे यांची माघार
शिवसेना–भाजप महायुतीला बळ; युतीत जल्लोषाचे वातावरण
चिपळूण : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले असून पहिल्याच टप्प्यात शिवसेना–भाजप महायुतीने प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र दिसत आहे. अशातच वेहेळे पंचायत समिती गणातून अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरलेले पंचक्रोशीतील कुणबी बहुजन समाजाचे तरुण व अभ्यासू कार्यकर्ते संजय जाबरे यांनी निवडणुकीतून माघार घेत शिवसेना–भाजप महायुतीला जाहीर पाठिंबा दिल्याने युतीच्या गोटात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या महत्त्वपूर्ण राजकीय घडामोडीमागे शिवसेना उपनेते व माजी आमदार सदानंद चव्हाण यांची यशस्वी मध्यस्थी निर्णायक ठरली असून, त्यांनी वेहेळे गणात महायुतीचे पारडे अधिक भक्कम केले आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत बहुतांश गण व गटांमध्ये तिरंगी व चौरंगी लढतीची शक्यता असताना, मंगळवार हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. मात्र, अंतिम दिवसाची वाट न पाहता माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी अपक्ष उमेदवारांच्या भेटीगाठी घेत त्यांचे मतपरिवर्तन करण्यात यश मिळवले आहे.
याआधी निवळी पंचायत समिती गणातून अपक्ष उमेदवार स्वाती जंगम यांनी दोन दिवसांपूर्वी आपला उमेदवारी अर्ज मागे घेत महायुतीला पाठिंबा दिला होता. त्यानंतर आता शिरगांव जिल्हा परिषद गटातील वेहेळे पंचायत समिती गणातून संजय जाबरे यांनी माघार घेतल्याने महायुतीची ताकद आणखी वाढली आहे. मंगळवारी ते अधिकृतपणे आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार आहेत.
सोमवारी संजय जाबरे यांनी आपल्या समर्थक व प्रमुख पदाधिकाऱ्यांसह माजी आमदार सदानंद चव्हाण तसेच प्रशांत यादव यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी महायुतीच्या तिन्ही उमेदवारांना आपला जाहीर पाठिंबा देत, त्यांच्या विजयासाठी खंबीरपणे पाठीशी उभे राहणार असल्याचा शब्द दिला. महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी विजयी करण्यासाठी सर्व शक्तीनिशी काम करणार असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
याबाबत माहिती देताना माजी आमदार सदानंद चव्हाण म्हणाले की, “संजय जाबरे हे माझे जवळचे सहकारी असून ते अत्यंत प्रामाणिक व निष्ठावान कार्यकर्ते आहेत. आमच्या विनंतीचा मान राखून त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेत महायुतीला पाठिंबा दिला आहे. हा निर्णय आमच्या विजयासाठी शुभ संकेत आहे. येणाऱ्या काळात त्यांनी केलेल्या त्यागाचा निश्चितपणे विचार केला जाईल आणि त्या माध्यमातून त्यांचा तसेच कुणबी बहुजन समाजाचा योग्य तो सन्मान राखला जाईल.”
संजय जाबरे यांच्या निर्णयामुळे वेहेळे गणासह संपूर्ण शिरगांव जिल्हा परिषद गटात, तसेच चिपळूण तालुक्यात शिवसेना–भाजप महायुतीची बाजू अधिक बळकट झाली असून, महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांकडून या निर्णयाचे स्वागत केले जात आहे. या घडामोडीमुळे आगामी निवडणुकीत महायुतीच्या विजयाची शक्यता अधिक मजबूत झाल्याचे राजकीय जाणकारांकडून बोलले जात आहे.










