WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

जीआयटीमध्ये अत्याधुनिक रोबोटिक्स, पीसीबी व 3D प्रिंटिंग प्रयोगशाळा


जीआयटीमध्ये अत्याधुनिक रोबोटिक्स, पीसीबी व 3D प्रिंटिंग प्रयोगशाळा

कोकणातील तांत्रिक शिक्षणाला नवी दिशा

विद्यार्थ्यांसाठी कौशल्यविकासाची सुवर्णसंधी

खेड : खेड येथील घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (GIT), लवेल येथील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी विभागामध्ये अत्याधुनिक रोबोटिक्स, पीसीबी (Printed Circuit Board) व थ्रीडी प्रिंटिंग प्रयोगशाळेचे उद्घाटन गुरुवार, दिनांक २२ जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात पार पडले.


या अत्याधुनिक प्रयोगशाळेचे उद्घाटन घरडा केमिकल्स लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर. सी. कुलकर्णी तसेच घरडा सामाजिक संस्थेचे कार्यकारी अधिकारी विनायक दळवी यांच्या हस्ते करण्यात आले. जीआयटीमधील ही रोबोटिक्स प्रयोगशाळा रोबोनिक्स ऑटोमेशन सोल्युशन्सचे श्री. हृषीकेश एम. शिंगे यांच्या सहकार्याने विकसित करण्यात आली असून उद्घाटनप्रसंगी ते विशेष उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासासाठी तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष व व्यावहारिक प्रशिक्षण देण्यासाठी ही प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. येथे रोबोटिक्स, पीसीबी डिझाईन व फॅब्रिकेशन तसेच थ्रीडी प्रिंटिंगसाठी आवश्यक अत्याधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे. संपूर्ण कोकण विभागात रोबोटिक्स क्षेत्रातील ही एक अग्रगण्य व तंत्रसुसज्ज प्रयोगशाळा ठरणार असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
या प्रयोगशाळेमुळे विद्यार्थी रोबोटिक्ससाठी आवश्यक असलेले विविध सुटे भाग स्वतः डिझाईन करून थ्रीडी प्रिंटिंगच्या माध्यमातून तयार करू शकणार आहेत. तसेच पीसीबी डिझाईन, सर्किट डेव्हलपमेंट व प्रोटोटायपिंग यांसारख्या प्रक्रियांचे प्रत्यक्ष ज्ञान मिळणार आहे. परिसरातील औद्योगिक वसाहतींच्या गरजा लक्षात घेऊन प्रकल्प विकसित करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार असून, याचा थेट फायदा त्यांच्या रोजगार व स्टार्टअप संधींसाठी होणार आहे.

या प्रयोगशाळेच्या उभारणीसाठी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागप्रमुख डॉ. सचिन खेडेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद पाटील यांनी विशेष सहकार्य व प्रेरणा दिली.

कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन प्रा. डॉ. श्रीशैल मुचंडे यांनी केले. यावेळी विभागातील प्राध्यापकवर्ग, विद्यार्थी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रयोगशाळेमुळे घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधील तांत्रिक शिक्षणाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.


612
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!