जि. प. सदस्या शिवानी सावंत यांची स्थायी समितीत निवड
रत्नागिरी : चिपळूण तालुक्यातील वहाळ जिल्हा परिषद गटातून प्रथमच निवडून आलेल्या सौ.शिवानी संदीप सावंत यांची थेट रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अत्यंत महत्वाच्या अशा स्थायी समितीवर निवड करण्यात आली आहे.
मंगळवारी स्थायी समितीचे गठन करण्यात आले. या वेळी पदसिद्ध अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषद अध्यक्षा तसेच सर्व समिती सभापती त्यांच्या बरोबर सदस्य म्हणून शिवानी सावंत यांना संधी देण्यात आली असून यानिमित्ताने वहाळ जिल्हा परिषद गटाला हा बहुमान देण्यात आला आहे.
नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत वहाळ गटातून शिवानी संदीप सावंत यांनी शिवसेनेकडून धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढवली होती. राजकीयदृष्ट्या अतिशय महत्वाच्या या गटातील निवडणुकीकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. परंतु अतिशय चुरशीच्या या निवडणुकीत शिवानी सावंत यांनी दणदणीत विजय प्राप्त करत रत्नागिरी जिल्हा परिषदेत दिमाखदार प्रवेश केला आणि आपल्या राजकीय कौशल्याची चुणूक दाखवून दिली होती.
जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून येताच दुसऱ्या दिवसापासून त्यांनी कामाला सुरुवात केली. वहाळ जिल्हा परिषद गटातील प्रलंबित असलेल्या कामाकडे लक्ष केंद्रित करून त्यांनी प्रशासनाला योग्य त्या सूचना देखील दिल्या होत्या. सामाजिक प्रश्नांची जाण, प्रशासकीय कामाची माहिती तसेच उच्चशिक्षित आणि आक्रमक भूमिका यामुळे त्यांनी अल्पवधीतच आपली छाप पाडली होती.सहाजिकच पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्या कामाची दखल घेत त्यांना थेट महत्वाच्या स्थायी समितीवर संधी देऊन त्यांच्या कार्यकर्तृत्वाला वाव दिला आहे.
जिल्हा परिषदेची स्थायी समिती ही अत्यंत महत्वाची समिती मानली जाते. जिल्हा परिषदेच्या तिजोरीच्या चाव्या या समितीकडे असतात. मोठे आणि महत्वाचे निर्णय तसेच निधीला मंजुरी, खर्चाला मंजुरी, जिल्हा परिषद मालमत्ता, अस्थापणाचे सर्व अधिकार या समितीकडे असतात. जिल्हा परिषद अध्यक्ष या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात तर सर्व समित्यांचे सभापती सदस्य म्हणून निवडले जातात तसेच जिल्हा परिषद सदस्यांमधून निमंत्रित सदस्य म्हणून काही मोजके सदस्य घेतले जातात त्यामध्ये सौ.शिवानी सावंत यांना संधी देण्यात आली आहे.
प्रथमच निवडणूक लढवून निवडून आले. तसा फारसा अनुभव नसताना देखील पक्षाचे नेते जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत तसेच सर्व नेत्यांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला स्थायी समितीत काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे ऋणी आहे. अध्यक्ष व सर्व सभापतींच्या नेतृत्वाखाली स्थायी समितीमध्ये उत्तम आणि अभ्यासू काम करून पक्षाचा विश्वास सार्थ ठरवेन.
सौ.शिवानी सावंत, सदस्या, जिल्हा परिषद.












