दहा किलो गांजासह तिघांना अटक
पाच लाखांचा मुद्देमाल जप्त; ‘मिशन फिनिक्स’ मोहिमेला यश
चिपळूण : जिल्हा पोलीस दलाच्या ‘मिशन फिनिक्स’ मोहिमेला मोठे यश मिळाले असून चिपळूण येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने धाडसी कारवाई करत १० किलो १३८ ग्रॅम गांजासदृश अमली पदार्थ जप्त केला आहे. या कारवाईत तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून सुमारे ४ लाख ६८ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे व अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अमली पदार्थांविरोधातील मोहीम तीव्र करण्यात आली आहे. मंगळवारी (दि. ३ मार्च) स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक चिपळूण परिसरात गस्त घालत असताना वालोपे येथील रेल्वे स्टेशन फाट्यासमोर, मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गालगत एक रिक्षाचालक आणि मोटारसायकलस्वार संशयास्पदरित्या चर्चा करताना आढळले.
पोलिसांनी संशयावरून चौकशी व झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून १० किलो १३८ ग्रॅम गांजा (अंदाजे किंमत २ लाख ५३ हजार ४५० रुपये) आढळून आला. तसेच रिक्षा व मोटारसायकलसह एकूण ४ लाख ६८ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या कारवाईत आकाश विजय जाधव (वय ३०), शिवकुमार भास्कर ठाकरे (वय ४८) आणि शंकर विनोद पारदे (वय ३१) या तिघांना ताब्यात घेण्यात आले असून ते खेड तालुक्यातील सुकीवली येथील रहिवासी आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास चिपळूण पोलीस करत आहेत.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रशांत बोरकर, सहाय्यक पोलीस फौजदार सुभाष भागणे, पोलीस हवालदार शांताराम झोटे, दीपराज पाटील आणि चालक पोलीस शिपाई प्रवीण होवाळ यांच्या पथकाने केली. जिल्ह्यातील अमली पदार्थांविरोधातील कारवाया यापुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.













