अपघातग्रस्त ‘त्या’ नाल्यावर लोखंडी रेलिंग अथवा सिमेंटचा कठडा उभारणार
नगरपालिका व राष्ट्रीय महामार्ग विभागाची संयुक्त पाहणी
चिपळूण : शहरातील बहादूरशेख नाका येथील मुतप्पन मंदिर गेट परिसरात महामार्गालगत असलेल्या खोल नाल्यात दुचाकी कोसळल्याची घटना नुकतीच घडली. गेल्या दोन महिन्यात हा चौथा अपघात घडल्यानंतर चिपळूण नगर पालिका पदाधिकारी, अधिकारी व राष्ट्रीय महामार्गच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी संयुक्तपणे पाहणी केली. एक-दोन दिवसात येथे लोखंडी रेलिंग अथवा सिमेंटचा कठडा उभारण्याचे ठरवण्यात आले.
शिमगोत्सवासाठी पुण्याहून संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथे घरी निघालेला तरूण बहादूरशेखनाका मुत्तपन मंदिर गेट जवळील नाल्यात दुचाकीसह कोसळल्याची घटना सोमवारी सायंकाळी साडेसात च्या सुमारास घडली होती. अरुंद रस्त्यामुळे दोन वाहनांची समोरासमोर टक्कर टाळण्यासाठी या तरुणाने गाडी वाचवण्याचा नादात दुचाकीसह रस्त्यालगतच्या नाल्यात कोसळला. गेल्या दोन महिन्यात येथे चार अपघात झाले आहेत. येथे रस्ता अरूंद आहे. शिवाय रस्ता आणि नाल्यांची उंची सारखीच आहे. नाल्याच्या कडेला संरक्षक कठडा नसल्याने थेट वाहने नाल्यात कोसळत आहे. एक रिक्षा देखील येथे कोसळली होती. येथे वारंवार अपघात होत असल्याने नागरिकांन संताप व्यक्त केला.
सातत्याने अपघात होऊनही कोणत्याच हालचाली होत नसल्याने त्याचे पडसाद सोशल मीडियावर उमटले होते. वाहनचालकांा जिव गेल्यानंतरच उपाययोजना करणार का असा सवाल सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पवार, सुबोध सावंत-देसाई यांच्यासह नागरिकांनी केला. अखेर बुधवारी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे शाखा अभियंता श्याम खुणेकर, बांधकाम सभापती कपिल शिर्के, नगरसेवक शशिकांत मोदी, नगरसेविका अंजली कदम, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पवार आदींनी पाहणी केली. यावेळी ठेकेदाराचे प्रतिनीधी देखील उपस्थित होते. महामार्गात लगत नाला असून तो समपातळीत आहे. काही वेळा येथून एकेरी वाहतूक सुरू असते. अशावेळी वाहने नाल्यात कोसळण्याचा संभव अधिक आहे. रात्रीच्या वेळी नाला दिसून येत नाही. त्यामुळे येथे सरंक्षक कठडा उभारण्यावर एकमत झाले. एक दोन दिवसात हे काम करणार असल्याचे सांगण्यात आले.













