WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

खो-खो खेळातील ‘तेजस्वी’ तारा हरपला


खो-खो खेळातील ‘तेजस्वी’ तारा हरपला

वांझोळे गावची सुवर्णकन्या तेजस्विनी सनगलेचा उपचारादरम्यान मृत्यू
पंधरा दिवसांपूर्वीच्या अपघातात डोक्याला झाली होती गंभीर दुखापत

संगमेश्वर : तालुक्यातील वांझोळे गावची सुवर्णकन्या आणि राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक पटकावणारी उदयोन्मुख खो-खो खेळाडू तेजस्विनी सनगले हिचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. कोल्हापूर येथे तिच्यावर उपचार सुरू होते; मात्र बुधवारी रात्री तिची प्राणज्योत मालवली. तिच्या अकाली निधनामुळे संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यावर शोककळा पसरली असून खो-खो खेळातील तेजस्वी तारा हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

तेजस्विनी सनगले ही वांझोळे (ता. संगमेश्वर) गावातील अत्यंत गुणी आणि जिद्दी खेळाडू म्हणून ओळखली जात होती. गेल्या काही वर्षांत वांझोळे गावाने खो-खो क्षेत्रात राज्य व राष्ट्रीय पातळीवरील अनेक खेळाडू घडवले असून, “खो-खोचे गाव” अशी ओळख निर्माण केली आहे. या परंपरेत तेजस्विनी ही एक आघाडीची आणि आश्वासक खेळाडू होती. वयाच्या अवघ्या १२व्या वर्षी तिने भुवनेश्वर (ओडिशा) येथे झालेल्या १४ वर्षांखालील राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी निवड मिळवली होती. त्या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत संघाला सुवर्णपदक मिळवून देण्यात तिचा मोलाचा वाटा होता. जिल्हा परिषद शाळेतील सर्वात कमी वयात राष्ट्रीय खेळाडू म्हणून तिने नावलौकिक मिळवला होता.

तेजस्विनीने अनेक स्पर्धांमध्ये आपल्या वेगवान, चपळ आणि आक्रमक खेळाच्या जोरावर संघाला विजय मिळवून दिला होता. उंचीने लहान असली तरी तिच्या खेळातील मोठेपणा सर्वांना जाणवायचा. मैदानावर विजेच्या वेगाने धावणारी तेजस्विनी आज त्याच वेगाने सर्वांना कायमची सोडून गेली, ही बाब क्रीडाप्रेमींसाठी अत्यंत वेदनादायक ठरली आहे.

आयुष्याच्या मैदानावर मात्र तिला हा लढा हरावा लागला, ही खंत सर्वांच्या मनात घर करून राहिली आहे. तिच्या निधनामुळे सनगले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून वांझोळे गावासह संपूर्ण पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खो-खो क्षेत्रासाठीही हा मोठा धक्का मानला जात आहे. संगमेश्वर तालुक्यातून तिच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

 


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!