WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

उपोषणस्थळी तणाव ; पत्रकाराला मारहाण


उपोषणस्थळी तणाव ; पत्रकाराला मारहाण

बहादूरशेखनाका येथील दोन वेगवेगळ्या घटना

परस्परविरोधी तक्रारी, ॲट्रॉसिटीसह दोन गुन्हे दाखल

चिपळूण : शहरातील बहादूरशेखनाका परिसरात बुधवारी (दि. 25 मार्च) दुपारच्या सुमारास घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. या प्रकरणी चिपळूण पोलीस स्थानकात परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या असून पत्रकाराला मारहाण प्रकरणी 10 ते 15 जणांवर तर जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी ॲट्रॉसिटी अंतर्गत असे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत. दोन्ही घटनांचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

पहिल्या घटनेत फिर्यादी अभिषेक चंद्रकांत मोहिते (वय 23, रा. चिपळूण) हे सकाळी सुमारे 11.30 वाजता सरबत आणण्यासाठी गेले असता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ काहीजण बॅनर लावताना दिसले. याबाबत विचारणा केल्यावर संबंधितांपैकी दोघांनी जातीवाचक शिवीगाळ करत अपमानित केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. तसेच दमदाटी करण्यात आल्याचेही नमूद आहे. या दरम्यान परिसरात नागरिक जमा झाल्याने बाचाबाची झाली आणि गोंधळात फिर्यादीची सोन्याची चेन चोरीला गेल्याचेही सांगण्यात आले आहे. या प्रकरणी रुपेश पवार व रविंद्र पवार (दोघे रा. खेड) यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 303 (2), 351 (2), 3(5) तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 (सुधारित 2015) कलम 3 (1)(आर)(एस) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसऱ्या घटनेत बहादूरशेखनाका परिसरात दुपारी सुमारे 12 वाजता रुपेश सुरेश पवार (रा. खेड) एका पतसंस्थेच्या कारभाराविरोधात उपोषणाला बसत असताना त्याचे वृत्तांकन करण्यासाठी पत्रकार दीपक दिलीप भागवत (रा. रत्नागिरी) व कॅमेरामन रुपेश साळुंखे घटनास्थळी गेले होते. त्यावेळी 10 ते 15 जणांच्या जमावाने “तू कसला पत्रकार” असे म्हणत त्यांना अडवून हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच शिवीगाळ व दमदाटी करत त्यांच्या साईड बॅगमधील ओळखपत्र व इतर साहित्य चोरीला गेल्याची तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणी अनोळखी 10 ते 15 जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 मधील 189(2), 190, 191(2), 303(2), 115(2), 352, 351(2), 351(3)कलमांसह महाराष्ट्र प्रसार माध्यम व्यक्ती व संस्था (हिंसा व मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक) अधिनियम 2017 कलम 4 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन्ही घटनांमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान पत्रकार दीपक भागवत यांना झालेल्या मारहाणीविरोधात पत्रकारांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. चिपळूणसह रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकारांनी या घटनेचा जाहीर निषेध करत संबंधित मारेकऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे.

 


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!