WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

शिवरायांची अर्थनीती आजही अनुकरणीय : प्रा. सोनाली खर्चे


शिवरायांची अर्थनीती आजही अनुकरणीय : प्रा. सोनाली खर्चे

‘डीबीजे’त शिवजयंती उत्साहात

चिपळूण : येथील नवकोंकण एज्युकेशन सोसायटी संचलित डीबीजे महाविद्यालयात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी अर्थशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका प्रा. सोनाली खर्चे यांनी ‘शिवाजी महाराजांची अर्थनीती’ या विषयावर मार्गदर्शन करताना शिवरायांची अर्थव्यवस्था जनतेच्या कल्याणावर आधारलेली होती, असे प्रतिपादन केले.

व्याख्यान प्रसंगी प्रा.सोनाली खर्चे , प्राचार्य डॉ.माधव बापट, खजिनदार संजीव खरे आदी मान्यवर.

प्रा. खर्चे म्हणाल्या की, छत्रपती शिवाजी महाराज यांची अर्थनीती ही केवळ राज्यकारभारापुरती मर्यादित नव्हती, तर ती सर्वसामान्य जनतेच्या हिताचा विचार करणारी होती. उत्पन्नाची साधने वाढविणे आणि खर्चाचा काटेकोर ताळमेळ राखणे या बाबींमध्ये शिवरायांचे धोरण अत्यंत शिस्तबद्ध आणि दूरदृष्टीपूर्ण होते. आज शासन राबवत असलेल्या अनेक योजनांची मुळे शिवाजी महाराजांच्या अर्थनीतीत सापडतात, असेही त्यांनी नमूद केले.

शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी व त्यांच्या उत्पन्नवाढीसाठी शिवरायांनी राबविलेली धोरणे आजच्या काळातही अनुकरणीय असल्याचे सांगत त्यांनी राज्यनिर्मितीसाठी मजबूत आर्थिक पायाभूत व्यवस्था किती महत्त्वाची असते, यावरही प्रकाश टाकला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. माधव बापट होते. त्यांनी आपल्या मनोगतात शिवरायांनी उभारलेली विशाल सत्ता आणि स्वराज्याची भक्कम उभारणी यामागे प्रभावी अर्थनीतीचा मोठा वाटा असल्याचे सांगितले.

यावेळी इतिहास विभागातर्फे ‘शिवाजी महाराज ज्ञानपरीक्षा’ घेण्यात आली. या परीक्षेला ५८० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. प्रथम क्रमांक हर्ष कदम (युनायटेड हायस्कूल), द्वितीय क्रमांक विरा शिंदे (सती हायस्कूल), तृतीय क्रमांक सई मते (दलवाई हायस्कूल) तर उत्तेजनार्थ सलोनी घाणेकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमास खजिनदार संजीव खरे, उपप्राचार्य डॉ. आर. एम. मोरे, डॉ. चेतन आठवले, प्रा. स्नेहल कुलकर्णी, डॉ. सुजाता खोत, रजिस्ट्रार विजयेंद्र जाधव, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच राष्ट्रीय सेवा योजना व इतिहास विभागाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. ज्ञानोबा कदम यांनी तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. मृण्मयी सोहनी यांनी केले.


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!