WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

प्रतिभेला जात, धर्म, शिक्षण, वयाचं बंधन नसतं : कवी राष्ट्रपाल सावंत


प्रतिभेला जात, धर्म, शिक्षण, वयाचं बंधन नसतं : कवी राष्ट्रपाल सावंत

🔷कवी जलसाकार पांडुरंग कदम यांच्या गीतसंग्रहाचे प्रकाशन

🔷शिष्यांकडून अनोखी आदरांजली

संगमेश्वर :“प्रतिभेला जात, धर्म, शिक्षण आणि वयाचं कोणतंच बंधन नसतं. कला ही उपजत असावी लागते,” असे भावनिक उद्गार काढत कवी राष्ट्रपाल सावंत यांनी दिवंगत कवी जलसाकार पांडुरंग कदम यांच्या साहित्य कार्याला अभिवादन केले. त्यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त आयोजित गीतसंग्रह प्रकाशन सोहळ्यात सावंत बोलत होते.

पांडुरंग शांताराम कदम यांचे २३ जून २०२५ रोजी अल्प आजाराने त्यांच्या मूळ गावी सायले येथे निधन झाले होते. अल्पशिक्षित असूनही त्यांनी कलेच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधनाचा वसा जपला. भीम संदेश संगीत जलसा मंडळ, भांडुप मुंबईची स्थापना करून त्यांनी सायले, नायरीसह विविध गावांत शाखा सुरू केल्या. गीतलेखन, गायन, वगनाट्य, छोट्या नाटिका आणि एकांकिका यांच्या माध्यमातून त्यांनी समाजजागृतीचे कार्य केले.

साधी राहणी आणि उच्च विचारसरणी जपणाऱ्या पांडुरंग कदम यांनी आपल्या वडिलांचा कलावारसा पुढे नेला. पत्नी प्राजक्ता, मुलगे प्रताप व प्रशांत, मुलगी पूनम तसेच बहीण शोभा जाधव आणि सहकलावंतांच्या प्रोत्साहनामुळे त्यांनी स्वतःला पूर्णपणे कला क्षेत्रासाठी वाहून घेतले होते.

त्यांच्या निधनानंतर शिष्य दीपक पवार, विनोद कदम, विजय मोहिते, विलास मोहिते, संदीप पवार, संदेश जाधव आणि प्रदीप कांबळे यांनी आपल्या गुरुंच्या आठवणी चिरंतन ठेवण्याचा निर्धार केला. कुटुंबीय व नातेवाईकांच्या संमतीने त्यांनी पांडुरंग कदम यांच्या १२० गीतांचा संग्रह पुस्तक रूपात प्रकाशित करण्यासाठी अथक प्रयत्न केले. अखेर १२ मे २०२६ रोजी संगमेश्वर तालुक्यातील सायले येथे गीतसंग्रह प्रकाशन सोहळा उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमात बोलताना राष्ट्रपाल सावंत म्हणाले की, “पांडुरंग कदम यांच्यासारख्या प्रतिभावंत व्यक्तीला योग्य संधी आणि मार्गदर्शन मिळाले असते तर त्यांची ओळख अधिक व्यापक झाली असती. त्यांच्या हयातीतच हे पुस्तक प्रकाशित झाले असते तर त्यांना मानसिक समाधान आणि आनंद मिळाला असता. मात्र त्यांच्या शिष्यांनी त्यांची इच्छा पूर्ण करून खरी श्रद्धांजली वाहिली आहे.”

या गीतसंग्रहाची प्रस्तावना देखील राष्ट्रपाल सावंत यांनी लिहिली असून त्यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. यावेळी भारतीय बौद्ध महासभा संगमेश्वरचे अध्यक्ष तथा माजी केंद्रप्रमुख राहुल मोहिते, विजय मोहिते, कवी मनोज जाधव, पत्रकार रुपेश कदम, सामाजिक कार्यकर्ते अरुण जाधव, सरपंच शिलाताई कदम, पोलीस पाटील शरद कदम, सुरेश जाधव, रतनदास कदम, बौद्धजन सेवा मंडळ, रमाई महिला मंडळ सायले, भीम संदेश संगीत जलसा मंडळ भांडुप मुंबई यांचे विशेष सहकार्य लाभले.

प्रथम स्मृतिदिन आणि गीतसंग्रह प्रकाशनानिमित्त कवी मनोज जाधव, दीपक पवार, अरुण जाधव, विजय मोहिते, शिलाताई कदम, राहुल मोहिते आणि राष्ट्रपाल सावंत यांनी पांडुरंग कदम यांच्या साहित्य आणि सामाजिक कार्याच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या मनोगतातून भावनांचा ओलावा स्पष्ट जाणवत होता.

कार्यक्रमास दिवंगत पांडुरंग कदम यांच्या पत्नी, मुलगे, मुली, सून, बहीण, नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


595
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!