पाणी योजना मार्गी न लागल्यास आंदोलन : सौ. शिवानी सावंत
मुर्तवडे सुतारवाडी ग्रामस्थांची पंचायत समितीवर धडक
योजना मार्गी लावण्याचे बीडीओंचे आश्वासन
चिपळूण : तालुक्यातील मुर्तवडे येथील सुतारवाडीमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर झालेल्या नळपाणी योजनेच्या कामात गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप करत जिल्हा परिषद सदस्या सौ. शिवानी संदीप सावंत यांनी आक्रमक भूमिका घेतली. ग्रामस्थांच्या साथीने त्यांनी पंचायत समितीवर धडक दिली. कामातील हलगर्जीपणामुळे ग्रामस्थांना त्याचा लाभ मिळत नाही. दोषींवर तात्काळ कारवाई करून ही योजना तातडीने पूर्ण करावी. अन्यथा ग्रामस्थांसह आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा सौ. सावंत यांनी दिला.
मुर्तवडे सुतारवाडीत सुमारे तीन वर्षांपूर्वी जलजीवन मिशन अंतर्गत ५१ लाख रुपयांची नळपाणी योजना मंजूर करण्यात आली होती. या योजनेचे काम ठेकेदार आशिष वसंत मोहरेकर यांना देण्यात आले. मात्र प्रत्यक्षात काम संथ गतीने व निकृष्ट झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या योजनेअंतर्गत फक्त विहिरीचा खड्डा मारण्यात आला असून पाण्याची टाकी अर्धवट अवस्थेत आहे. जलजीवन मिशनचे पाईप गावात फक्त टाकून ठेवले आहेत. योजना पूर्णत्वास न गेल्याने संपूर्ण काम निकृष्ट दर्जाचे व अपूर्ण अवस्थेत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
काम पूर्ण न होता देखील संबंधित ठेकेदाराने सुमारे ४१ लाख रुपयांचे बिल अदा केले तरी सुतारवाडीतील नागरिकांना अद्याप पाणी मिळालेले नाही. ग्रामस्थांवर नदीतील दुषीत पाणी पिण्याची वेळ आल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण आहे. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी जिल्हा परिषद सदस्य शिवानी संदीप सावंत यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समिती गाठली. यावेळी गटविकास अधिकारी उमा घार्गे पाटील यांनी म्हणणे ऐकून घेत उद्या प्रत्यक्ष गावात जाऊन पाहणी करण्याचे आश्वासन दिले. तसेच सोमवारी जलसिंचन विभागाचे डेप्युटी इंजिनिअर, संबंधित ठेकेदार व ग्रामस्थ यांची संयुक्त बैठक घेऊन प्रश्न निकाली काढणार असल्याचे स्पष्ट केले.












