हॉटेल व्यावसायिक, खानावळी, विद्यार्थी वसतिगृहे ‘गॅस’वर
चिपळूण कॉंग्रेसचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन
चिपळूण : देशात सध्या प्रचंड महागाईमूळे सर्व सामान्य नागरिकांचे जगणे अत्यंत कठीण झाले आहे. केंद्र व राज्य सरकारने घरगुती व व्यवसायिक गॅस सिलेंडर तसेच पेट्रोलियम पदार्थांच्या किमतीत सातत्याने वाढ करुन सामान्य लोकांवर अतिरिक्त आर्थिक बोजा टाकला आहे. या दरवाढी विरोधात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस शिष्टमंडळाने प्रांत अधिकारी आकाश लिगाडे यांना निवेदन दिले.
प्रांताधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनानुसार, सरकारच्या सततच्या दरवाढीमुळे कुटुंबाचे मासिक अर्थकारण कोलमडून गेले आहे. महागाईत बेरोजगारी वाढली आहे. शिक्षण फी, घरपट्टी, पाणी पट्टी, वीज बीले यांचीही प्रचंड वाढ झाली आहे. या महागाईला मोदी सरकारची नितीमत्ता जबाबदार आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील युपीए सरकारच्या काळात इंधनाच्या किंमती वाढल्या असताना त्याचा भार सर्व सामान्य जनतेवर पडू दिला नव्हता. परंतु सध्या नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गॅस सिलेंडर व इतर जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढवून जनतेला महागाईच्या खाईत लोटून आर्थिक कोंडी केली आहे. २०१४ पुर्वी घरगुती गॅस सिलेंडर ४०० रुपयांना मिळत होता. आज रोजी तोच गॅस सिलेंडर ९३० रुपयांना मिळत आहे. सिलेंडर मिळण्यासाठीचा प्रतिक्षा कालावधीही वाढविला आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडर दर १९०० च्या पुढे आहेत. त्यामूळे हॉटेल व्यावसायिक, खानावळी, विद्यार्थी वसतिगृहे आणि सामान्य नागरिक यांना गॅस सिलेंडर वेळेवर व सहज मिळत नाही. लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. या सर्व परिस्थिचा विचार करून, केंद्र सरकार व राज्य सरकारने दर कमी करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली आहे.
निवेदन देताना तालुकाध्यक्ष महादेव चव्हाण, महिला तालुकाध्यक्षा निर्मला जाधव, मुजफ्फर सय्यद, संजय जाधव, सुरेश पाथरे,अजीत शिंदे, विणा जावकर, नगरसेविका सफा गोठे, विनायक जाधव, दिनेश माटे, सुनिल खेडेकर, विनायक जाधव, नंदा भालेकर, तुळशीराम पवार आदी काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.













