WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

महायुतीच्या गटनेतेपदाचे शिलेदार ठरले


महायुतीच्या गटनेतेपदाचे शिलेदार ठरले

चिपळूण नगर परिषदेत भाजपकडून शशिकांत मोदी, शिवसेनेतून अंकुश आवले ‘किल्ला’ लढवणार

चिपळूण : येथील नगर परिषदेवर एकहाती सत्ता मिळविलेल्या भाजप-शिवसेना-आरपीआय महायुतीने आता गटनेतेपदाचे चेहरेही समोर आणले आहेत. यंदाच्या निवडणुकीत मुसंडी मारणाऱ्या भारतीय जनता पार्टीने ‘विजयाचा चौकार’ ठोकणारे नगरसेवक व शहर अध्यक्ष शशिकांत मोदी यांची गटनेतेपदी निवड केली आहे. तर शिवसेनेने पहिल्यांदाच निवडणूक लढवून विजयाची गुढी उभारणारे, माजी आमदार सदानंद चव्हाण यांचे विश्वासू सहकारी, युवा कार्यकर्ते अंकुश आवले यांच्या खांद्यावर गटनेते पदाची जबाबदारी दिली आहे.

चिपळूण नगर परिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर राजकीय घडामोडींना वेग आला असून, नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आता नगरपरिषदेत गटनेतेपदाच्या नियुक्त्या जाहीर होऊ लागल्या आहेत. यापूर्वी शिवसेना उबाठा पक्षाकडून मिथिलेश ऊर्फ विकी नरळकर यांची गटनेतेपदी निवड जाहीर करण्यात आली होती. चिपळूण नगर परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) ९, भाजप ७, शिवसेना उबाठा ५, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) २, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) २ तर काँग्रेसचे ३ नगरसेवक निवडून आले आहेत.

शशिकांत मोदी हे यापूर्वी शिवसेनेत तीन वेळा नगरसेवक होते. पक्षफुटीनंतर काही काळ त्यांनी उद्धव ठाकरे गटासोबत वाटचाल केली. मात्र काही महिन्यांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश करताच त्यांच्यावर शहर प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली. पक्षातील काही घटकांचा विरोध झुगारून देत मोदी यांनी संघटन मजबूत करण्यावर भर दिला. त्याचेच फलित म्हणून प्रभाग क्रमांक ९ मधून त्यांनी तब्बल ८०० हून अधिक मतांनी दणदणीत विजय मिळवला. त्यांच्या या कामगिरीची दखल घेत भाजपने पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास दाखवत गटनेतेपद सोपवले आहे.

दुसरीकडे, प्रभाग क्रमांक ११ मधून प्रथमच निवडणूक लढवून विजय मिळवलेले अंकुश आवले यांची शिवसेना (शिंदे गट) गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. नवख्या असतानाही पक्षाने दाखवलेला विश्वास आणि मिळालेली संधी ही त्यांच्या राजकीय वाटचालीतील महत्त्वाची पायरी मानली जात आहे.
गटनेतेपदी निवड झाल्यानंतर शशिकांत मोदी आणि अंकुश आवले यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, “पक्षाच्या वरिष्ठांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवू. चिपळूण शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील राहू,” अशी ग्वाही या दोघांनी दिली आहे.


595
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!