चिपळुणात २१ पासून माघी गणेशोत्सव सोहळा
चार दिवस धार्मिक-सांस्कृतिक उपक्रम
चिपळूण : आदर्श क्रीडा आणि सामाजिक प्रबोधिनी, काविळतळी (ता. चिपळूण) यांच्या वतीने १५ वा माघी गणेशोत्सव सोहळा बुधवार दि. २१ जानेवारी ते शनिवार दि. २४ जानेवारी २०२६ या कालावधीत विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांनी साजरा होणार आहे.

बुधवार दि. २१ रोजी सायंकाळी ४ वाजता श्रींच्या आगमन सोहळ्याने उत्सवाची सुरुवात होणार आहे. गुरुवार दि. २२ रोजी पहाटे ५ वाजता श्रींच्या मूर्तीची स्थापना व काकड आरती होईल. सकाळी ८ वाजता शमी, दुर्वा, खोबरे व तुपाने श्रींचे सहस्त्र हवन, सकाळी १० वाजता जन्मपूजा तर ११ वाजता जन्मोत्सव कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ७ वाजता धुपारती व रात्री ८ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.

शुक्रवार दि. २३ रोजी पहाटे ५ वाजता काकड आरतीनंतर सकाळी ८ ते १० या वेळेत गणेश गायत्री मंत्र पठण होणार आहे. सकाळी १० वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा, दुपारी ३ ते सायंकाळी ७ या वेळेत महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभ, सायंकाळी ७ वाजता श्रींची धुपारती होईल. रात्री ८ वाजता रत्नागिरी जिल्हा हौशी शरीर सौष्ठव निवड चाचणी स्पर्धा २०२६ होईल.

शनिवार दि. २४ रोजी सकाळी ५ वाजता काकड आरती, सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत आरोग्य शिबीर, सकाळी ११ वाजता श्रींचा अभिषेक करण्यात येणार आहे. सायंकाळी ५ वाजता श्रींच्या विसर्जन मिरवणुकीने उत्सवाची सांगता होईल.
या सर्व कार्यक्रमांचा भाविक व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष श्री. सचिन (भैय्या) कदम यांनी केले आहे.












