WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

लोटेतील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीवर विराट मोर्चा


लोटेतील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीवर विराट मोर्चा

कंपनीवर आंदोलकांचा हल्लाबोल, पालकमंत्री, गृहराज्यमंत्र्यांनी राजीनामे देण्याची मागणी

चिपळूण : घातक रसायने बनविणाऱ्या लोटे येथील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीवर चिपळूण व खेड तालुक्यातील नागरिकांनी धडक मोर्चा काढला. कंपनीविरोधात तीव्र घोषणाबाजी करीत आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला. मुख्यमंत्र्यांनी कंपनी त्वरित बंद करावी अशी मागणी करतानाच स्थानिक आमदार, खासदार, जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उद्योगमंत्री, गृहराज्यमंत्री कंपनीविषयी काहीच बोलत नसल्याने आंदोलकांनी त्यांचा निषेध केला. जिल्हाधिकारी तसेच जिल्ह्यातील दोन्ही मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी मोर्चावेळी करण्यात आली. या निमित्ताने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.

लोटे येथील लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधात गेल्या दोन महिन्यापासून 75 दिवस धरणे आंदोलन सुरू आहे. आंदोलनाची तीव्रता वाढण्यासाठी कोकण नागरी संघर्ष समिती व लोटे पंचक्रोशी पर्यावरण संरक्षण समितीच्या वतीने लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनी विरोधात सोमवारी धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाच लोटे पंचक्रोशीसह चिपळूण व खेड तालुक्यातील ग्रामस्थ व महिलांनी सहभाग घेतला. मुंबई-गोवा महामार्गावरील एक्सेल फाटा येथून मोर्चाला सुरूवात झाली. सकाळी १० वाजल्यापासून आंदोलक जमत होते. चिपळूण व खेड तालुक्यातील माजी सैनिक देखील मोठ्या प्रमाणात आंदोलनात सहभागी झाले. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मोर्चा काढण्याचा हेतू स्पष्ट केला. गेले ७५ दिवस अशोक जाधव व राजेंद्र आंब्रे हे कंपनी विरोधात उपोषणाला बसले आहेत. स्थानिक प्रशासनाचे त्याची दखल घेतलेली नाही. पीफासचे उप्तादन घेणारी कंपनी आंदोलकांना जुमानत नाही. घातक रसायनांचा योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यात येत असल्याचा दावा कंपनीकडून झाला असला तरी तो चुकीचा आहे. कंपनीचे सांडपाणी टँकरद्वारे सीईटीपीला दिले जाते. जबबुडीवर नदीवर याच कंपनीच्या टँकरचा अपघात झाला. सुरक्षितपणे घातक रसायनांची विल्वेहाट लावली जात नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

मानवी जीवनावर विपरीत परिणाम करणारी कंपनी कोकणातून हद्दापार करावी. स्थानिकाच्या आरोग्यास घातक ठरणाऱ्या कंपनीविरोधात राजकारणी चकार शब्द काढत नाहीत. पिफास बाबत देशात कायदे नाहीत. याचाच आधार घेत या कंपनीला काही अटी घालून मान्यता देण्यात आली. यासंदर्भात कडक कायदे करून त्वरित कंपनी बंद करण्याची मागणी केली. समितीचे उदय घाग, अशोक जाधव, राजेंद्र आंब्रे, मनसे पदाधिकारी, कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सोनलक्ष्मी घाग, तसेच आम आदमी पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी मनोगत व्यक्त केले. समितीच्या वतीने जिल्हा प्रशासन आणि पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन दिले. निवेदनात उपस्थित केलेल्या प्रश्नांची माहिती २० दिवसात देण्याची मागणी केली. मोर्चा शांततेत काढण्यात आल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.


आंदोलकाच्या भावनांची आम्ही कदर करतो. त्यांनी जे प्रश्न उपस्थित केले आहेत, त्यांचे सविस्तर उत्तर लवकरच दिले जाणार आहे. यापूर्वी दोनवेळा आंदोलकांनी निवेदन दिले होते, त्याचेही उत्तर त्यांना दिले. केवळ येथेच पिएफएएस घटक असलेले उत्पादन होतेच असे नाही तर भारतात जवळपास ५५ हजार मेट्रीक टन याचे उत्पादन होत आहे. पिएफएएस घटक असलेली अनेक उत्पादने दैनंदिन जीवनात वापरात असलेल्या वस्तूंमध्ये वापरले जाते. पिएफएएस बाबत लोकांमध्ये गैरसमज आहे, लोकांमध्ये जावून तो दूर करण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत, यापुढेही ते सुरू राहतील.

दीपक पाटील, उपाध्यक्ष लक्ष्मी ऑरगॅनिक ( उत्पादन विभाग )


595
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!