लाट मिरवणुकीत लोटला जनसागर!
धामणदेवी येथे त्रैवार्षिक जत्रौत्सव (समा)
चिपळूण : ग्रामदेवता मंदिर कमिटी, नवतरूण मित्र मंडळ धामणदेवी, मुंबई व ग्रामीण (ता. खेड) यांच्या संयुक्त विद्यमाने श्री देवी सुकाई, झोलाई, कालकाई ग्रामदेवता धामणदेवी येथे आयोजित मंदिर वर्धापन दिन सोहळा व त्रैवार्षिक जत्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी, २ फेब्रुवारी २०२६ रोजी भव्य लाट मिरवणूक मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात पार पडली. भिले येथून ढोल-ताशांच्या गजरात निघालेल्या या मिरवणुकीने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.

लाट आणण्यासाठी पहाटेपासूनच भाविकांनी मोठी गर्दी केली होती. लहानग्यांपासून युवक, महिला, वृद्ध अशा सर्व वयोगटातील भक्तांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. मिरवणुकीदरम्यान ठिकठिकाणी गाव, वाडी तसेच देवस्थान समित्यांकडून लाटेचे स्वागत करण्यात आले. त्यासाठी रस्ते, परिसरात रांगोळी, सजावट, लाऊड स्पीकर यांची व्यवस्था करण्यात आली होती. दर्शनासाठी भाविकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी करत देवीच्या जयघोषात परिसर दुमदुमून टाकला. ही लाट मिरवणूक भिले (भुवडवाडी) जांभळी बंदर करंबवणे रोड, कालुस्ते, शिरळ, कोंढे-करंबवणे फाटा, मिरजोळी, उक्ताड चौक, गोवळकोट कमानी, पेठमाप, फरशीमार्गे पेढे, धामणदेवी अशी काढण्यात आली. संपूर्ण मार्गावर जणू जत्राच भरल्याचा अनुभव नागरिकांना आला. ही लाट उद्या सायंकाळी 4 वाजचा चढवली जाणार आहे.
लाट मिरवणुकीच्या निमित्ताने परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून जत्रौत्सवासाठी भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. देवीच्या कृपेने गावात सुख-समृद्धी नांदावी, अशी प्रार्थना भाविकांनी यावेळी केली.











