कोकण रेल्वे-एस.टी फुल्ल!
सुट्टीनंतर कोकणवासियांची मोठी पंचायत
तिकीट असूनही प्रवास नाही, खाजगी बसवाल्यांची चांदी
चिपळूण : शनिवार, रविवार आणि प्रजासत्ताक दिन अशी सलग तीन दिवसांची सुट्टी मिळाल्याने कोकणात जत्रेचेच वातावरण निर्माण झाले होते. मुंबई, पुण्यासह राज्याच्या विविध भागांतून लाखो पर्यटक आणि कोकणवासी आपल्या गावाकडे दाखल झाले. मात्र सुट्ट्या संपताच सोमवारी परतीच्या प्रवासाला सुरुवात करताना प्रवाशांची अक्षरशः कोंडी झाली.
रेल्वे, एस.टी आणि खाजगी बसेस सर्वच फुल्ल झाल्याने सुट्टीसाठी गावाकडे आलेल्या कोकणवासियांची मोठी पंचायत झाली. चिपळूण-वालोपे रेल्वे स्थानक तसेच चिपळूण मध्यवर्ती बस स्थानकात प्रवाशांची अक्षरशः झुंबड उडाली होती. कुटुंबासह, लहान मुलांसह आणि वयोवृद्ध प्रवाशांना प्रचंड हाल सहन करावे लागले.
तिकीट असूनही गाडीत प्रवेश नाही!
अनेक प्रवाशांनी आधीच रेल्वे तिकीट काढले होते. मात्र गर्दी इतकी प्रचंड होती की, तिकीट असूनही गाडीत शिरता न आल्याने अनेकांना आर्थिक फटका बसला. सर्वच रेल्वे गाड्यांना तुफान गर्दी झाल्याने, “प्रवाशांनी आपापल्या जबाबदारीवर तिकीट काढावे” अशा सूचना देण्याची नामुष्की कोकण रेल्वे प्रशासनावर आली.
एस.टी बस स्थानकात ‘फुल्ल’चा बोर्ड
चिपळूण मध्यवर्ती बस स्थानकातील तिकीट बुकिंग काउंटरवर तर ‘सर्व गाड्या फुल्ल’ असा थेट बोर्ड लावण्यात आला होता. बस मिळेल की नाही, याची शाश्वती नसल्याने अनेक प्रवासी तासन्तास बस स्थानकातच अडकून पडले.
खाजगी बसवाल्यांची चांदी
रेल्वे आणि एसटी फुल्ल असल्याचा थेट फायदा अनेक खाजगी बसचालकांनी उचलला. चिपळूण ते मुंबई प्रवासासाठी तब्बल 1200 ते 1500 रुपये तिकीट भाडे आकारण्यात आले. नाईलाजास्तव प्रवाशांना हा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला.
प्रवाशांचे हाल, व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
एकीकडे सुट्ट्यांच्या काळात प्रवाशांची वाढती संख्या, तर दुसरीकडे अपुरी वाहतूक व्यवस्था यामुळे हजारो प्रवाशांचे मुंबई प्रवासादरम्यान प्रचंड हाल झाले. सुट्टीच्या काळात अतिरिक्त गाड्या, बससेवा आणि नियोजनाची आवश्यकता असल्याची जोरदार मागणी यानिमित्ताने पुन्हा एकदा समोर आली आहे.












