खेर्डीच्या श्री सुखाई ग्रामदेवता पालखीत वाय-फाय, सिसिटिव्ही अन लाईव्ह लोकेशन
रत्नागिरी जिल्ह्यातील पहिलाच उपक्रम, धार्मिक परंपरेला आधुनिकतेची जोड
चिपळूण ः तालुक्यात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या खेर्डी गावचा विस्तार दिवसेदिवस वाढतो आहे. परिणामी शिमगोत्सवात गावातील लोकांना घरबसल्या पालखीची माहिती मिळावी यासाठी पालखीत वाय-फाय सिसीटिव्हीची यंत्रणा बसवण्यात आली. यातून पालखीचे लाईव्ह लोकेशन मिळण्यास मदत झाली. धार्मिक परंपरेला आधुनिक तंत्रज्ञानाची तोड देत खेर्डीतील श्री ग्रामदेवी सुखाई देवस्थान समितीने ग्रामदेवतेची पालखी आधुनिक सुविधांनी सुसज्ज केली आहे.
यावर्षी खेर्डी येथील श्री ग्रामदेवी सुखाई देवस्थानची पालखी हायटेक स्वरूपात भक्तांच्या सेवेत दाखल झाली. या पालखीत वाय-फाय सुविधा, सिसीटिव्ही कॅमेरे, इनव्हर्टर व्यवस्था तसेच लाईव्ह लोकेशन ट्रॅकिंग प्रणाली बसवण्यात आली. पालखीत आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रथमच हा उपक्रम करण्यात आला आहे. चिपळूण शहरालगत असलेल्या खेर्डी गावची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. वाढत्या शहरीकरणाचा वेध घेत श्री. ग्रामदेवी सुखाई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष कैलास शेंबेकर यांनी विश्वस्थांना विश्वासात घेत गावात घरोघरी फिरणाऱ्या पालखीत वाय-फाय सुविधा, सिसीटिव्ही कॅमेरे, इनव्हर्टर व्यवस्था तसेच लाईव्ह लोकेशन ट्रॅकिंग प्रणाली बसवण्याचा निर्णय घेतला. पालखी कोणत्या भागात पोहोचली याची अचूक माहिती देवस्थान अध्यक्षांच्या मोबाईलवर उपलब्ध होत आहे. या व्यवस्थेमुळे पालखीचे सुरक्षा व्यवस्थापन अधिक पारदर्शक आणि सुकर झाले आहे. पालखीच्या सुरक्षेला बळकटी मिळाली असून भाविकांच्या गर्दीचे योग्यरित्या नियोजन ही केले जात आहे. विशेष म्हणजे इनव्हर्टर व्यवस्थेमुळे विजपुरवठा खंडीत झाल्यास पालखीतील दिवे व सिसिटिव्ही यंत्रणा सुरू राहणार आहे. तसेच लाईव्ह लोकेशन प्रणालीमुळे ग्रामस्थांना पालखीचे आगमन कधी होणार याची अचूक माहिती मिळत आहे. कोकणातील ग्रामदेवतांच्या पालखीत अशा प्रकारे आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करणारा हा पहिलाच उपक्रम आहे.











