खासदार नारायण राणे यांचा जनता दरबार
नागरिकांच्या प्रश्नांवर होणार थेट संवाद
रत्नागिरी : जिल्ह्यातील नागरिकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी आणि त्यांचे निवारण करण्यासाठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाचे खासदार नारायणराव राणे यांनी ‘जनता दरबार’ या उपक्रमाचे आयोजन केले आहे. तीन टप्प्यात होणाऱ्या या जनता दरबारांमधून विविध तालुक्यातील नागरिकांना आपल्या समस्या मांडण्याची संधी मिळणार आहे.
पहिला जनता दरबार दि. २८ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी २ वाजता चिपळूण येथील सहकार भवन येथे आयोजित करण्यात आला आहे. या ठिकाणी चिपळूण तालुक्यातील नागरिकांनी आपल्या स्थानिक प्रश्नांसह उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दुसरा टप्पा २९ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता देवरुख (संगमेश्वर) येथील मराठा हॉल, भाजप तालुका कार्यालयाजवळ आयोजित केला जाणार आहे. संगमेश्वर तालुक्यातील नागरिकांनी आपल्या समस्या घेऊन येथे सहभागी व्हावे.
तर अंतिम जनता दरबार ३० ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील डी.पी.डी.सी. सभागृह, रत्नागिरी येथे होणार आहे. या ठिकाणी रत्नागिरी तालुक्यातील नागरिकांचे प्रश्न प्रत्यक्षपणे ऐकून घेण्यात येतील.
या उपक्रमातून मतदारसंघातील जनतेच्या अडचणींचे त्वरित निराकरण व्हावे, यासाठी खासदार नारायण राणे यांनी पुढाकार घेतला आहे. नागरिकांनी आपले अर्ज, तक्रारी आणि सूचना घेऊन वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी केले आहे.












