“अगं शालू झोका दे गो मैना” फेम प्रभाकर मोरे उद्या सावर्डेत
स्व. गोविंदरावजी निकम जयंती महोत्सवात उपस्थिती
सावर्डे : सह्याद्री शिक्षण संस्थेचे संस्थापक, माजी खासदार स्व. गोविंदरावजी निकम यांची 91 वी जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी होत आहे. सावर्डे येथील ‘स्मृतिगंध’ या स्मारकस्थळी शुक्रवार दिनांक 16 जानेवारीपासून भव्य जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्त शनिवार दि.17 जानेवारी रोजी बक्षीस वितरण सोहळा पार पडणार असून या कार्यक्रमासाठी “अगं शालू झोका दे गो मैना”, हास्य जत्रा फेम प्रभाकर मोरे यांची उपस्थिती लाभणार आहे.

शनिवारी सकाळी 9.30 वा. स्व.गोविंदरावजी निकम जिल्हास्तरीय वक्तृत्व व निबंध स्पर्धा, सह्याद्रि शिक्षण संस्थेच्या 67 व्या वर्धापन दिनानिमित्त घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धांचे बक्षीस वितरण होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मराठी अभिनेते प्रभाकर मोरे उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष आमदार शेखर गोविंदराव निकम, सह्याद्रि शिक्षण संस्था सर्व विश्वस्त यांचीही उपस्थिती लाभणार आहे. स.11 वा. सह्याद्री बाल कलाविष्कार (प्राथमिक विभाग, सह्याद्रि शिक्षण संस्था, सावर्डे), दु.2.30 वा. सह्याद्रि युवा कलाविष्कार (व्यावसायिक महाविद्यालये, सह्याद्रि शिक्षण संस्था, सावर्डे ) सादर करणार आहेत. तरी या जयंती महोत्सवात नागरिकांनी कुटुंबीयांसह मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेचे सचिव महेश महाडिक व महोत्सव आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.














