रत्नागिरी वनविभागाचा राज्यात ठसा ; गिरीजा देसाई यांच्यासह तिघांना सुवर्ण पदक
रत्नागिरी : वनसंपत्तीचे प्रभावी संरक्षण, सुयोग्य वनव्यवस्थापन आणि वनसेवेतील उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर रत्नागिरी वनविभागाने राज्यात आपला ठसा उमटवला आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने दि. २५ मार्च २०२६ रोजी जाहीर केलेल्या राज्यस्तरीय पदकांमध्ये रत्नागिरी जिल्ह्याने विशेष कामगिरी नोंदवली आहे.
विभागीय वन अधिकारी श्रीमती गिरीजा देसाई यांना त्यांच्या उत्कृष्ट सेवेसाठी प्रतिष्ठेचे सुवर्ण पदक जाहीर झाले आहे. त्यांच्या या सन्मानामुळे संपूर्ण वनविभागात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.
या गौरवामध्ये केवळ वरिष्ठ अधिकाऱ्यांचाच नव्हे, तर प्रत्यक्ष मैदानी स्तरावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचाही सन्मान करण्यात आला आहे. वनपाल श्री. सुरेश आत्माराम उपारे आणि श्री. रामदास दत्तात्रय खोत यांनाही त्यांच्या उल्लेखनीय सेवेसाठी सुवर्ण पदकाने गौरविण्यात आले आहे. तसेच वनसंरक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या एका वनरक्षकास रजत पदक जाहीर करण्यात आले आहे.
या पदकांसाठी निवड प्रक्रिया अत्यंत काटेकोर पद्धतीने राबविण्यात आली. अपर मुख्य सचिव (वने) यांच्या अध्यक्षतेखालील समितीने संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे गोपनीय अहवाल, तांत्रिक कार्यक्षमता आणि प्रत्यक्ष कामगिरीची सखोल छाननी करून अंतिम निवड केली.
महाराष्ट्र शासनाने सन २०२३-२४ आणि २०२४-२५ या कालावधीत राज्यातील एकूण ५९ अधिकारी व कर्मचाऱ्यांना ही पदके जाहीर केली आहेत. वन व वन्यजीव संरक्षण, वनव्यवस्थापन, वनविस्तार आदी सहा विविध कार्यप्रकारांमध्ये हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील या मानकरी अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यातून जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असून, त्यांच्या या यशाची नोंद सेवापुस्तकात घेण्याचे आदेशही शासनाने दिले आहेत. या सन्मानामुळे वनसेवेत कार्यरत इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रेरणा मिळणार असल्याचे मत व्यक्त होत आहे.












