कराड–चिपळूण महामार्ग ६० दिवस राहणार बंद
धांडे पुलाची पुनर्बांधणीसह बाजारपेठेतील काँक्रीट रस्त्याचे काम हाती, वाहतुकीत मोठा बदल
सातारा : महाराष्ट्र पोलीस अंतर्गत सातारा पोलीस अधीक्षक कार्यालय यांनी कराड ते चिपळूण या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ ई वरील वाहतुकीबाबत महत्त्वाची अधिसूचना जारी केली आहे. पाटण शहरातील धांडे पुलाची पुनर्बांधणी तसेच बाजारपेठेतील काँक्रीट रस्त्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याने हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे.
ही बंदी २७ मार्च २०२६ ते २७ मे २०२६ या कालावधीत लागू राहणार असून, सुमारे ६० दिवस वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. नागरिक व वाहनचालकांची गैरसोय टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाने पर्यायी मार्गांची आखणी केली आहे.
पर्यायी वाहतूक मार्ग असे –
१) कराड व उंब्रजकडून चिपळूणकडे जाणारी अवजड वाहतूक :
कराड – उंब्रज – राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ – पाचवड फाटा – उंडाळे – कोकरुड – मलकापूर – आंबा घाट – संगमेश्वर – चिपळूण
२) चिपळूणकडून कराड व उंब्रजकडे जाणारी अवजड वाहतूक :
चिपळूण – संगमेश्वर – आंबा घाट – मलकापूर – कोकरुड – उंडाळे – पाचवड फाटा – राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ – कराड/उंब्रज
३) कराड व उंब्रजकडून चिपळूणकडे जाणारी हलकी वाहतूक :
कराड – उंब्रज – नवारस्ता – गहाळवाडी फाटा – नेरळे गोंड – चिपळूण
४) चिपळूणकडून कराड व उंब्रजकडे जाणारी हलकी वाहतूक :
चिपळूण – नेरळे गोंड – गहाळवाडी फाटा – नवारस्ता – कराड/उंब्रज
पोलीस प्रशासनाचे आवाहन
वाहतूक बदलाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून, नागरिकांनी व वाहनचालकांनी नवीन मार्गांची माहिती घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ही अधिसूचना तुषार दोशी (पोलीस अधीक्षक, सातारा) यांनी २५ मार्च २०२६ रोजी जारी केली आहे.
महामार्गावरील कामांमुळे वाहतुकीत मोठे बदल होणार असल्याने प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करून पर्यायी मार्गांचा वापर करणे आवश्यक आहे.












