चिपळूणची कन्या फातिमा मुकादम हिचे कतार महिला क्रिकेट संघात दमदार पदार्पण
चिपळूण : कोकणच्या भूमीतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटविश्वात झेप घेणारी आणखी एक अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. चिपळूण तालुक्यातील गोवळकोट गावाशी नाळ जोडलेली फातिमा खालिद मुकादम हिने अवघ्या १५व्या वर्षी Qatar Senior Women’s Cricket Team मध्ये दमदार पदार्पण करत इतिहास रचला आहे.
कॅप्टन खालिद अब्दुल वहाब मुकादम यांची कन्या असलेली फातिमा ही मध्यमगती गोलंदाज असून मधल्या फळीत जबाबदारीने फलंदाजी करण्याची तिची खासियत आहे. लहान वयातच तिने क्रिकेटमधील आपली गुणवत्ता सिद्ध केली असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याचा मान मिळवणारी ती चिपळूणची पहिली तरुणी ठरली आहे.
फातिमाचे कुटुंब सध्या कतारमध्ये वास्तव्यास असले तरी तिच्या वडिलांचे मूळ गाव गोवळकोट, चिपळूण आहे. त्यामुळे तिच्या या यशाने केवळ मुकादम कुटुंबाचाच नव्हे, तर संपूर्ण चिपळूण शहराचा मान उंचावला आहे. कोकणच्या मातीतून मिळालेली जिद्द, शिस्त आणि कष्ट करण्याची वृत्ती यामुळेच फातिमाने आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले स्थान निर्माण केले आहे.
१५व्या वर्षी वरिष्ठ महिला संघात स्थान मिळवणे ही अत्यंत मोठी आणि दुर्मिळ कामगिरी मानली जाते. कठोर सराव, सातत्यपूर्ण मेहनत आणि खेळाप्रती असलेली निष्ठा याच्या जोरावर तिने हा टप्पा गाठला आहे. तिच्या पदार्पणाच्या सामन्याने भविष्यातील उज्ज्वल कारकिर्दीचे संकेत दिले असून, पुढील काळात ती कतार संघासाठी महत्त्वाची खेळाडू ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
फातिमाच्या या ऐतिहासिक यशाबद्दल चिपळूणमधील विविध सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सोशल मीडियावरही तिच्या कामगिरीचे कौतुक होत असून, “कोकणची लेक आंतरराष्ट्रीय मैदानावर” अशा शब्दांत तिचा गौरव केला जात आहे.
कोकणातील मुलींनी क्रीडा क्षेत्रात मोठी स्वप्ने पाहावीत आणि त्यासाठी जिद्दीने प्रयत्न करावेत, असा प्रेरणादायी संदेश फातिमाच्या यशातून मिळत आहे. तिच्या पुढील वाटचालीसाठी चिपळूणकरांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत असून, भविष्यात ती आणखी मोठी भरारी घेईल, अशी सर्वांना आशा आहे.













