डॉ. राजरत्न राष्ट्रपाल सावंत प्रथम श्रेणीत एम.डी. उत्तीर्ण
चिपळूण : तालुक्यातील कळमुंडी गावचे सुपुत्र, उमरोली येथील रहिवाशी, कवी साहित्यिक, भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचे अध्यक्ष राष्ट्रपाल भागुराम सावंत आणि सौ. आकांक्षा सावंत यांचे सुपुत्र डॉ.राजरत्न सावंत यांनी अण्णासाहेब डांगे आयुर्वेद मेडिकल कॉलेज आष्टा, सांगली येथून एम.डी. पंचकर्म ही पदव्युत्तर पदवी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण होऊन यश संपादित केलेले आहे.
राजरत्न यांनी 2021 मध्ये कोडोली कोल्हापूर येथून बीए.एम.एस. ही वैद्यकीय पदवी संपादित केलेली होती. त्यांचे प्राथमिक शिक्षण जि. प केंद्रशाळा तनाली, माध्यमिक शिक्षण वसंतराव भागवत माध्यमिक विद्यालय मार्गताम्हाणे, तर बारावी सह्याद्री शिक्षण संस्थेच्या सती चिंचघरी येथून उत्तीर्ण होऊन वैद्यकीय शिक्षण घेतलं आहे. बीए.एम.एस नंतर त्यांनी इ.एम.एस, सीसीएच पूर्ण केले आहे. फेलोशिप इंटर्नल मेडिसिन सुरु आहे.
राजरत्न यांनी प्राप्त केलेल्या यशाबद्दल लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाचनालय, चिपळूण तालुका बौध्दजन हितसंरक्षक समिती, धार्मिक सामाजिक शैक्षणिक संस्था शिक्षक संघटनेचे सर्व पदाधिकारी मित्र मंडळी नातेवाईक यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
राजरत्न यांना वाचन, निवेदन गायन, अभिनय, दिग्दर्शन यांची आवड आहे. वडील राष्ट्रपाल सावंत यांचे धार्मिक, सामाजिक साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय काम सुरू असून वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत सामाजिक क्षेत्रात झोकून काम करण्याचा, रुग्ण सेवा करण्याचा राजरत्न यांचा मानस आहे. वेळोवेळी शिक्षक, प्राध्यापक याबरोबरच आई-वडिलांचे मोठे प्रोत्साहन आणि पाठिंबा आपल्याला मिळाला त्यामुळे आपण हे यश मिळवू शकलो असे राजरत्न यांनी सांगितले.












