WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

चिपळूणचे सुपुत्र उमेश चांदिवडे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलसचिवपदी


चिपळूणचे सुपुत्र उमेश चांदिवडे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलसचिवपदी

चिपळूण : दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठास तब्बल आठ वर्षानंतर नियमित कुलसचिव मिळाले आहेत. कृषी विभागात भरीव कामगिरी करणारे मुळचे चिपळूण तालुक्यातील खडपोली गावचे सुपुत्र, उपसचिव उमेश चांदिवडे यांची मंत्रालयातून विद्यापीठाच्या कुलसचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

कुलसचिव उमेश चांदिवडे यांनी राज्य सरकारच्या कृषी विभागात ९ वर्षे भरीव काम केले आहे. या कालावधीत त्यांनी बियाणे, ग्राम बीजोत्पादन, सेंद्रिय शेती, परंपरागत कृषी विकास योजना, जमीन आरोग्य पत्रिका, कृषी विद्यापीठे या क्षेत्रात नाविन्यपुर्ण उपक्रम राबवले.

कृषी क्षेत्रातील प्रशासकीय सेवेबाबत त्यांना सन २०२१ चा राज्य शासनाचा राज्यस्तरीय पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्काराने राज्यपालांच्या २९ सप्टेंबर २०२४ रोजी गौरवण्यात आले होते. उमेश चांदिवडे हे चिपळूण तालुक्यातील खडपोली गावचे मूळ रहिवासी आहेत. सध्या ते मंत्रालयात उपसचिव या पदावर कार्यरत आहेत. आता पर्यंत शासनाच्या नियोजन, कृषी, तसेच गृह विभागात काम केलेले आहे. कुलसचिव चांदिवडे हे प्रशासनातील अनुभवी व कार्यक्षम अधिकारी म्हणून ओळखले जातात. मंत्रालयात विविध प्रशासकीय खात्यात काम करताना त्यांनी संघटन कौशल्य, निर्णय क्षमता आणि पारदर्शक कारभाराची छाप पाडली आहे. कुलसचिवपद विद्यापीठाच्या प्रशासनाचा कणा मानला जातो.

विद्यापीठातील प्रशासकीय तसेच वित्तीय व्यवहारांचे समन्वय साधण्याची जबाबदारी या पदावर असते. कुलसचिव चांदिवडे यांनी आपल्या गावची नाळ तोडलेली नाही. खडपोली येथे त्यांचे नियमित येणे जाणे असते. गावी आल्यावर देखील ते स्थानिक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात. मुळचे कोकणी असलेल्या उमेश चांदिवडे यांना कोकणातील शेती व्यवस्थेची चांगली जाण आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे विद्यापीठाच्या सर्वांगीण प्रगतीला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


595
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!