WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

लोकसहभागातून  उभारलेली देवराई  निसर्ग संवर्धनासाठी प्रेरणादायी – पालकमंत्री उदय सामंत


लोकसहभागातून  उभारलेली देवराई  निसर्ग संवर्धनासाठी प्रेरणादायी – पालकमंत्री उदय सामंत

प्रांताधिकाऱ्यांचे पालकमंत्र्याकडून कौतूक,  देवराईला अनेकांचा हातभार, १७० जातीची १४७५ झाडे

चिपळूण : चिपळूण तालुक्यातील कळंबस्ते येथे उभारण्यात आलेल्या ‘देवराई – द बोटॅनिकल गार्डन’ या पर्यावरणपूरक प्रकल्पाचे तसेच या उपक्रमासाठी पुढाकार घेणाऱ्या प्रांताधिकारी आकाश लिगाडे व प्रशासनाचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी विशेष कौतुक केले. पर्यावरण संवर्धनासाठी अशा उपक्रमांची मोठी गरज असून लोकसहभागातून उभारलेली ही देवराई भविष्यात निसर्ग संवर्धनासाठी प्रेरणादायी आहे. देवराई – द बोटॅनिकल गार्डन’ स्थानिक जैवविविधतेचे जतन, पर्यावरण शिक्षण आणि निसर्ग पर्यटनाला चालना देणारे महत्त्वाचे केंद्र ठरेल, असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.

प्रांताधिकारी कार्यालय व सह्याद्री निसर्ग मित्र संस्था यांच्या पुढाकारातून कळंबस्ते (रेल्वे फाटकाजवळ), ता. चिपळूण येथे उभारण्यात आलेल्या ‘देवराई – द बोटॅनिकल गार्डन’ या प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा शनिवारी पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला.

हा प्रकल्प आरजीपीपीएल (RGPPL) आणि नेरोलॅक (NEROLAC) यांच्यासह विविध संस्था आणि व्यक्तींच्या सहकार्यातून साकारण्यात आला आहे.

लोकार्पणानंतर पालकमंत्री उदय सामंत यांनी देवराई बोटॅनिकल गार्डनची पाहणी केली. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, “कोकणातील नैसर्गिक संपदा आणि जैवविविधता जपणे ही काळाची गरज आहे. कळंबस्ते येथे उभारलेली ही देवराई केवळ वृक्षसंवर्धनाचा प्रकल्प नसून पर्यावरणाबाबत जनजागृती करणारे एक महत्त्वाचे केंद्र ठरेल. विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना निसर्गाचा अभ्यास करण्यासाठी ही देवराई उपयुक्त ठरेल. अशा प्रकारचे उपक्रम पुढील काळातही अधिक ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न केला जाईल.”

यानंतर आयोजित कार्यक्रमात प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी मनोगत व्यक्त करताना या प्रकल्पाच्या उभारणीत झालेल्या लोकसहभागाचे कौतुक केले. प्रशासन, सामाजिक संस्था आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वी झाला असून भविष्यात पर्यावरणाबाबत जनजागृती करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावेल, असे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला आमदार शेखर निकम, माजी आमदार रमेश कदम, माजी आमदार सदानंद चव्हाण, नगराध्यक्ष उमेश सकपाळ, सभापती सूर्यकांत खतले, माजी सभापती शौकत मुकादम, उपसभापती संदेश आयरे, पंचायत समिती सदस्य विनोद झगडे, स्नेहा साळवी, स्नेहा रहाटे नितीन ठसाळे, जिल्हा परिषद सदस्य पूजा निकम, भाजप नेते प्रशांत यादव, विनोद भुरण, डॉ. निखिल चोरगे, मुख्याधिकारी संजय जाधव, नगरसेवक निहार कोवळे, कपिल शिर्के, अंकुश आवले  यांच्यासह उपविभागीय कृषी अधिकारी शिवाजी शिंदे, सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेचे संचालक भाऊ काटदरे, पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे, माजी सभापती जितेंद्र चव्हाण यांच्यासह जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, विविध पक्षांचे पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

 


612
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!