WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

रत्नागिरीचा ‘विराट’ हरपला


रत्नागिरीचा ‘विराट’ हरपला

पोलीस दलाच्या लाडक्या श्वानाला शासकीय इतमामात अखेरचा निरोप

9 वर्षांच्या झुंजार कारकिर्दीचा अस्त

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाचा विश्वासू, कर्तव्यनिष्ठ आणि अनेक गुन्ह्यांच्या उकलामध्ये मोलाची भूमिका बजावणारा ‘विराट’ हा पोलीस श्वान काळाच्या पडद्याआड गेला. त्याच्या निधनाने संपूर्ण पोलीस दलात हळहळ व्यक्त होत असून, एक निष्ठावान सहकारी हरपल्याची भावना सर्वांच्या मनात दाटून आली आहे.

डॉबरमन जातीचा ‘विराट’ २०१७ साली रत्नागिरी जिल्हा पोलीस दलात दाखल झाला होता. गेल्या नऊ वर्षांत त्याने आपल्या तीक्ष्ण बुद्धिमत्ता, अचूक वास घेण्याची क्षमता आणि अफाट निष्ठेच्या बळावर अनेक गुन्ह्यांच्या तपासात पोलिसांना महत्त्वाची मदत केली. त्याच्या हुशारीमुळे अनेक गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात आले. त्यामुळे ‘विराट’ केवळ श्वान न राहता पोलीस दलाचा एक महत्त्वाचा सहकारी बनला होता.
सेवेच्या काळात ‘विराट’ने दोन खुनाच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना मार्गदर्शन केले. तसेच एका अपहरणाच्या प्रकरणातही त्याच्या अचूक माग काढण्याच्या कौशल्यामुळे आरोपींपर्यंत पोहोचणे शक्य झाले. याशिवाय जिल्ह्यातील दहा चोरीच्या गुन्ह्यांचा तपास लावण्यातही त्याची कामगिरी उल्लेखनीय ठरली होती.

‘विराट’च्या निधनानंतर बॉम्ब शोधक व नाशक पथकाच्या (BDDS) कार्यालय परिसरात त्याला शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. पोलीस दलाने सलामी देत आपल्या या निष्ठावान सहकाऱ्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अप्पर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव, राजेंद्र कुळसंगे, पोलीस उपनिरीक्षक किरण घाग, शेगाबेन मावची यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विराटचे हँडलर म्हणून पोलीस हवालदार महेश हरचिरकर आणि संदेश कोतवडेकर यांनी त्याची सेवा पाहिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विराटने अनेक धाडसी मोहिमा यशस्वी केल्या. त्याच्या कामगिरीच्या आठवणी रत्नागिरी पोलीस दलाच्या इतिहासात कायम जिवंत राहतील.

 

 


595
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!