११४ वर्षाचा ‘संगमेश्वर डाकबंगला’ होणार इतिहास जमा
संगमेश्वर : ब्रिटीश काळात अधिकाऱ्यांसह अभियंत्यांच्या निवासासाठी उभारलेले डाकबंगले आजही कोकणच्या वारशाची साक्ष देतात. त्यापैकीच एक असलेला संगमेश्वर येथील ११४ वर्षे जुना डाकबंगला — आता इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे. मुंबई–गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामामुळे या डाकबंगल्याला येत्या काही दिवसांत जमीनदोस्त करण्यात येणार आहे.
सन १९११ साली सोनवी आणि शास्त्री नद्यांच्या संगमासमोर, निसर्गरम्य परिसरात हा डाकबंगला उभारण्यात आला होता. ब्रिटीश अभियंते व अधिकारी यांचा संगमेश्वर येथे दीर्घ मुक्काम असायचा. त्यांच्यासाठी निवास आणि भोजनाची सुविधा म्हणून माभळे गावाच्या हद्दीत ही भव्य वास्तू उभी राहिली. स्वातंत्र्यानंतरही या बंगल्याचा वापर शासकीय निवासस्थान म्हणून सुरूच राहिला.
मात्र, आता मुंबई–गोवा महामार्गाचे चौपदरीकरण वेगाने पूर्ण करण्यासाठी या वास्तूचा बळी दिला जाणार आहे. सर्वेक्षण आणि नियोजनादरम्यान प्रयत्न होऊनही या ब्रिटीशकालीन हेरिटेज इमारतीचे संरक्षण शक्य झाले नाही.
संगमेश्वर परिसरात आजही अनेक दगडी पूल आणि इमारती ब्रिटीश काळातील वास्तुकलेचे दर्शन घडवतात. त्याच परंपरेतील हा डाकबंगला आता नकाशावरून नाहीसा होणार असून, कोकणच्या वारशातील एक पान मिटणार आहे.













