रत्नागिरी जिल्ह्यातील क्राईम घटना
घराबाहेर उभी दुचाकी चोरीला
चिपळूण : तालुक्यातील सती चिंचघरी येथे घराबाहेर उभी केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रमेश गजानन चाळके (वय 57, रा. सती चिंचघरी, ता. चिपळूण) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. दि. 10 मे 2026 रोजी सायंकाळी 7 ते 8 वाजण्याच्या सुमारास त्यांनी त्यांच्या घराबाहेर रस्त्याच्या कडेला हिरो कंपनीची पॅशन प्रो दुचाकी (एमएच 08 एके 4693) उभी केली होती. अज्ञात चोरट्याने संधी साधून सदर दुचाकी चोरून नेली. चोरीस गेलेल्या दुचाकीची किंमत सुमारे 90 हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता 2023 कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
मंडणगडमध्ये अवैध वाळूसाठा; एकावर गुन्हा
मंडणगड : उमरोली गावाजवळील खाडी परिसरात शासनाची कोणतीही परवानगी न घेता अवैध वाळूसाठा केल्याप्रकरणी मंडणगड पोलिसांनी एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मंडळ अधिकारी संतोष रघुनाथ गायकवाड (वय 56, रा. विन्हे, ता. मंडणगड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, कुशल अशोक सुळे (वय 40, रा. उमरोली, ता. मंडणगड) याने सर्व्हे नं. 1/अ/2 या जागेत सुमारे 10.07 ब्रास वाळूचा साठा करून ठेवला होता. या वाळूची अंदाजे किंमत 1 लाख 700 रुपये इतकी आहे. शासन महसुलाचे नुकसान करून शासनाच्या नैसर्गिक संपत्तीची चोरी केल्याचा आरोप आरोपीवर ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 कलम 48(7) तसेच भारतीय न्याय संहिता 2023 कलम 303(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वालोपे येथे भीषण अपघात; चालक ठार, पाच गंभीर जखमी
चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील वालोपे येथील एचपी पेट्रोल पंपासमोर बुधवारी पहाटे भीषण अपघात झाला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार 25 ते 30 फूट खोल खड्ड्यात कोसळली. या अपघातात चालकाचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
झीशान फिरोज सावंत (वय 23) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संजय कृष्णा जाधव (वय 51, रा. माकंडी, चिपळूण) हे टोयोटा कंपनीची कार घेऊन मुंबईहून चिपळूणच्या दिशेने येत होते. दि. 20 मे रोजी पहाटे 4.30 वाजण्याच्या सुमारास वालोपे येथील एचपी पेट्रोल पंपाजवळ आल्यानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. कार थेट रस्त्याच्या बाजूच्या खोल खड्ड्यात जाऊन समोरील मातीच्या ढिगाऱ्यावर जोरात आदळली.
या भीषण अपघातात चालक संजय जाधव यांचा जागीच मृत्यू झाला. तर आफिन (44), रिया असीम मुल्ला (40), हुजैर (10), अहिल असीम मुल्ला (4), रिदा नासीर मोडक (28) तसेच फिर्यादी झीशान सावंत हे गंभीर जखमी झाले. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 106(1), 281, 125(अ), 125(ब) तसेच मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
रत्नागिरीत डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी
रत्नागिरी : नाणीज धनगरवाडी परिसरात डंपर चालकाच्या निष्काळजीपणामुळे झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस उपनिरीक्षक मोहन रामचंद्र कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, एमडी अस्लम अब्दुल रहमान (रा. मिर्झापूर, मुजफ्फरपूर, बिहार) हा डंपर (एमएच 08 बीपी 5651) घेऊन रत्नागिरीहून कोल्हापूरच्या दिशेने जात होता. दरम्यान, कोणताही इशारा न देता अचानक वाहन उजव्या बाजूला वळवल्याने सुमेध विजयसिंग चौहान (रा. सांगली) यांच्या दुचाकीला जोरदार धडक बसली.
या अपघातात चौहान गंभीर जखमी झाले असून त्यांच्या दुचाकीचे मोठे नुकसान झाले. अपघातानंतर आरोपी चालकाने जखमीस उपचारासाठी न नेता घटनास्थळावरून पलायन केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
रत्नागिरी शहरात वाहतुकीस अडथळा; ट्रॅव्हल्स चालकावर गुन्हा
रत्नागिरी : सार्वजनिक रस्त्यावर ट्रॅव्हल्स वाहन उभे करून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस कर्मचारी राहुल विश्वराम जाधव (वय 40) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सलीम सलाउद्दीन शेख (वय 60, रा. गोरेगाव, मुंबई) याने त्याच्या ताब्यातील ट्रॅव्हल्स वाहन (एमएच 12 वाय बी 1718) शिवाजीनगर बसस्टॉप परिसरात चुकीच्या पद्धतीने उभे केले होते. त्यामुळे इतर वाहनांना तसेच पादचाऱ्यांना अडथळा निर्माण होत होता. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 285 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजापुरात गावठी दारूसह एक जण ताब्यात
राजापूर : गावठी हातभट्टीची दारू विक्रीसाठी बाळगल्याप्रकरणी राजापूर पोलिसांनी एका व्यक्तीवर कारवाई केली आहे.
पोलीस कर्मचारी स्वप्नील प्रताप घाटगे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सुदिन काशिनाथ तेलंग (वय 50, रा. पाचल पेठवाडी, ता. राजापूर) याच्या ताब्यातून 9 लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली. जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे 1 हजार रुपये आहे. महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65(ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खेडमध्ये गावठी दारू विक्रीप्रकरणी महिलेवर गुन्हा
खेड : देऊळवाडी परिसरात गावठी हातभट्टीची दारू विक्रीसाठी बाळगल्याप्रकरणी एका महिलेविरोधात खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरती किरण डोंगरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अश्विनी अशोक कदम (वय 50, रा. वाडीबीड देऊळवाडी, ता. खेड) हिच्या ताब्यातून 5 लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली. जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे 500 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बेलवाडीत हातभट्टी दारूसह एकावर कारवाई
खेड : बेलवाडी परिसरात गावठी हातभट्टीची दारू विक्रीसाठी बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीवर कारवाई केली आहे.
किरण रमेश सपकाळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, नारायण सिताराम कदम (वय 45, रा. कोरेगाव बेलवाडी, ता. खेड) हा झोपडपट्टीलगत गावठी हातभट्टीची दारू विक्रीसाठी बाळगताना आढळून आला. पोलिसांनी त्याच्याकडून 25 लिटर दारू जप्त केली असून जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे 2 हजार 600 रुपये आहे. महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भरणे बाईतवाडीत गावठी दारू जप्त
खेड : भरणे बाईतवाडी येथे गावठी हातभट्टीची दारू विक्रीसाठी बाळगल्याप्रकरणी एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विजेंद्र रमेश सातार्डेकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संजय मधुकर जगदाळे (वय 51, रा. भरणे बाईतवाडी, ता. खेड) याच्या ताब्यातून 25 लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली. जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे 2 हजार 600 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लांजात विदेशी मद्यसाठ्यावर कारवाई
लांजा : परवानगीशिवाय विदेशी मद्यसाठा बाळगल्याप्रकरणी लांजा पोलिसांनी एका महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
महिला पोलीस कॉन्स्टेबल वैभवी रुपेश नारकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, वैशाली गणेश कदम (वय 60, रा. कोंडगे पहिलीवाडी, ता. लांजा) हिच्या ताब्यातून विविध प्रकारचे विदेशी मद्य जप्त करण्यात आले. यात 15 टिन बिअर, 4 बाटल्या व्हिस्की आणि 3 बाटल्या रम असा एकूण 3 हजार 270 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65(ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंडणगडमध्ये देशी दारूसह एकावर गुन्हा
मंडणगड : कुंभळे पाटीलवाडी येथे देशी दारू विक्रीसाठी बाळगल्याप्रकरणी मंडणगड पोलिसांनी एका व्यक्तीवर कारवाई केली आहे.
धनंजय शांताराम सावंत (पोलीस हवालदार) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सुरेश शांताराम पाटील (वय 63, रा. कुंभळे पाटीलवाडी, ता. मंडणगड) हा परवानगीशिवाय देशी दारू विक्रीसाठी बाळगताना आढळून आला. त्याच्याकडून 180 मिलीच्या जीएम संत्रा देशी दारूच्या 11 बाटल्या जप्त करण्यात आल्या असून मुद्देमालाची किंमत सुमारे 880 रुपये आहे. महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खेडमध्ये बेपत्ता तरुणाचा मृतदेह शेतात आढळला
खेड : गेल्या आठ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह खेडजाई मंदिराजवळील शेतात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
बाळू विठ्ठल वाळे (वय 32, सध्या रा. खेड कुंभारवाडा, मूळ रा. सांगली) हा सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. तो काही दिवसांपासून बेपत्ता होता. त्याचा भाऊ खंडू विठ्ठल वाळे यांनी शोध घेतला असता खेडजाई मंदिराजवळ शशिकांत राजाराम दांडेकर यांच्या शेतात एका पुरुषाचा मृतदेह आढळून आला. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. अंगावरील कपडे आणि शरीरावरील खुणांवरून मृतदेहाची ओळख बाळू वाळे अशी पटली. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वृद्धेचा मृत्यू
रत्नागिरी : उपचारासाठी दाखल असलेल्या एका वृद्ध महिलेचा जिल्हा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाल्याची नोंद शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
लक्ष्मी मधुकर पाळेकर (वय 73, रा. फगरवठार, रत्नागिरी) यांना प्रकृती बिघडल्याने उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.
रुग्णालयात उपचारादरम्यान वृद्धाचा मृत्यू
रत्नागिरी : तालुक्यातील नांदिवडे येथील उदय गुणाजी मेणे (वय ७७) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
उदय मेणे हे कण्याच्या आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर डॉ. अनिल पाटील यांच्या औषधोपचारास सुरुवात करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना दम लागण्याचा त्रास होऊ लागल्याने १९ मे रोजी सकाळी १० वाजता त्यांना उपचारासाठी नेण्यात आले होते. मात्र प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना रात्री ११.३० वाजता सिद्धीविनायक हॉस्पिटल, रत्नागिरी येथे दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना २० मे रोजी दुपारी २.४३ वाजण्याच्या सुमारास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
दापोलीत वृद्ध महिलेचा घरात मृतदेह आढळला
दापोली : तालुक्यातील टाळसुरे संतोषीमाता नगर येथे एका वृद्ध महिलेचा घरात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सुवर्णा महादेव रीसबुड (वय ७६, रा. टाळसुरे संतोषीमाता नगर, ता. दापोली, जि. रत्नागिरी) असे मृत महिलेचे नाव आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सुवर्णा रीसबुड या टाळसुरे येथील संतोषीमाता नगर परिसरात एकट्याच राहत होत्या. गेल्या चार दिवसांपासून त्या घराबाहेर दिसून न आल्याने शेजाऱ्यांना संशय आला. शेजाऱ्यांनी त्यांच्या घराजवळ जाऊन आवाज दिला असता आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. तसेच घराच्या खिडकीजवळ उग्र वास येत असल्याने गावचे पोलीस पाटील विजय सपकाळ व शेजारी मंदार जुवेकर यांनी घराचा मुख्य दरवाजा तोडून आत प्रवेश केला. यावेळी घरातील बेडरूममध्ये खाटेजवळ सुवर्णा रीसबुड यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला.
ही घटना २० मे २०२६ रोजी सायंकाळी उघडकीस आली असून याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ४४/२०२६ बी.एन.एस. १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
निरूळ सडा येथे इसमाचा मृत्यू
रत्नागिरी : तालुक्यातील निरूळ सडा येथील पायवाटेवर पडून एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सुनील गणपत चव्हाण (वय ५२, रा. नाचणे गोसावीवाडी, ता. जि. रत्नागिरी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मयत हे दारूच्या व्यसनाधीन असल्याचे त्यांच्या भावाने पोलिसांना सांगितले. २० मे रोजी सकाळी ८.३० वाजल्यापासून ते घरातून बाहेर गेले होते. सायंकाळपर्यंत घरी परत न आल्याने त्यांच्या आई व भावाने शोधाशोध सुरू केली. त्यानंतर निरूळ सडा परिसरातील पायवाटेवर त्यांचा मृतदेह आढळून आला.












