संगमेश्वर काँग्रेसकडून दोन जि. प. व चार पं.स. गणांत उमेदवार रिंगणात
शास्त्रीपुल येथील कार्यालयातून प्रचाराला सुरुवात
संगमेश्वर : राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी दोन जिल्हा परिषद गट व चार पंचायत समिती गटांमध्ये उमेदवार रिंगणात उतरवण्यात आले असून शास्त्रीपुल येथील काँग्रेस कार्यालयातून प्रचाराची अधिकृत सुरुवात करण्यात आली आहे.

शनिवारी सायंकाळी शास्त्रीपुल येथे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष नुरुद्दीन सय्यद यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी तालुका अध्यक्ष काशीराम वाजे यांनी काँग्रेसच्या पारंपरिक मतदारांकडून भरघोस प्रतिसाद मिळत असल्याने सर्व उमेदवार निश्चितच विजयी होतील, असा ठाम विश्वास व्यक्त केला.
या कार्यक्रमास माजी तालुका अध्यक्ष फैजशेठ पाटणकर, अशोक पवार, गुरव, राजुशेठ पाटील यांच्यासह कडवई जि.प. गटातील कुंभारखाणी येथील उमेदवार आशिष सुर्वे, कडवई पं.स. गटाच्या उमेदवार मिताली कडवईकर, कुंभारखाणी पं.स. गटाचे उमेदवार चंद्रकांत कदम तसेच कोसुंब व कोंडगाव येथील उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शास्त्रीपुल परिसरात काँग्रेस पक्षाच्या ‘हात’ या निवडणूक चिन्हाचे झेंडे दिमाखात फडकताना दिसत असून त्यामुळे काँग्रेस पक्षात नवचैतन्य संचारल्याचे चित्र दिसून येत आहे. जवळपास पंधरा वर्षांनंतर या भागात काँग्रेसची निशाणी ठळकपणे दिसत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. काँग्रेस हा गरीबांचा पक्ष असून उमेदवार स्वतः खर्च करून पायी फिरत डोअर-टू-डोअर प्रचार करत आहेत. सर्व उमेदवारांनी यावेळी आपलाच विजय होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.












