WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

वृद्धापकाळातील आर्थिक सुरक्षिततेला मिळणार बळ!


वृद्धापकाळातील आर्थिक सुरक्षिततेला मिळणार बळ!

अटल पेन्शन योजनेला २०३१ पर्यंत मुदतवाढ

केंद्र सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : वृद्धापकाळात आर्थिक सुरक्षितता मिळावी या उद्देशाने केंद्र सरकारने सुरू केलेल्या अटल पेन्शन योजना (Atal Pension Yojana – APY) ला आणखी पाच वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीनुसार ही योजना आता २०३०–३१ आर्थिक वर्षाअखेर, म्हणजेच २०३१ पर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे अद्याप या योजनेत सहभागी न झालेल्या नागरिकांसाठी ही एक महत्त्वाची संधी ठरणार आहे.

विशेषतः शेतकरी, ग्रामीण भागातील नागरिक, मजूर, स्वयंरोजगार करणारे आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी ही योजना मोठा आधार ठरत असून, वृद्धापकाळातील नियमित उत्पन्नाची हमी या योजनेतून मिळते.

बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अटल पेन्शन योजनेला मुदतवाढ देण्यास मान्यता देण्यात आली. यासोबतच या योजनेच्या प्रचार-प्रसारासाठी, जनजागृती मोहिमा राबवण्यासाठी तसेच विकासात्मक उपक्रमांसाठी निधी समर्थन आणि गॅप फंडिंगमध्ये वाढ करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. अधिकाधिक नागरिकांनी या योजनेत सहभागी व्हावे आणि वृद्धापकाळातील उत्पन्न सुरक्षा अधिक मजबूत व्हावी, हा सरकारचा मुख्य उद्देश आहे.

केंद्र सरकारने ९ मे २०१५ रोजी अटल पेन्शन योजनेची सुरुवात केली. असंघटित क्षेत्रातील कामगार, लहान शेतकरी, मजूर, फेरीवाले व स्वयंरोजगार करणाऱ्या व्यक्तींना वृद्धापकाळात नियमित पेन्शन मिळावी, हा या योजनेचा मुख्य हेतू आहे.

आज ही योजना देशातील लाखो नागरिकांसाठी आर्थिक आधार बनली आहे. १९ जानेवारी २०२६ पर्यंत देशभरात सुमारे ८६.६ दशलक्षांहून अधिक नागरिकांनी अटल पेन्शन योजनेत नोंदणी केली आहे.

अटल पेन्शन योजना ही सरकार समर्थित सामाजिक सुरक्षा पेन्शन योजना आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला वयाच्या ६० वर्षांनंतर दरमहा १,००० ते ५,००० रुपये इतकी निश्चित पेन्शन मिळते. पेन्शनची रक्कम लाभार्थ्याने निवडलेल्या पर्यायावर अवलंबून असते.

लाभार्थ्याच्या मृत्यूनंतर ही पेन्शन त्यांच्या पती किंवा पत्नीस दिली जाते. दोघांच्याही मृत्यूनंतर योजनेअंतर्गत जमा झालेली संपूर्ण रक्कम नामनिर्देशित व्यक्तीस (Nominee) परत केली जाते.

अटल पेन्शन योजनेचा लाभ कसा घ्यावा
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने खालील प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे :
वय १८ ते ४० वर्षांच्या दरम्यान असणे
बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते असणे
आधार कार्ड आणि मोबाईल नंबर खात्याशी लिंक असणे
निवडलेल्या पेन्शन रकमेप्रमाणे मासिक योगदान भरणे
हे योगदान ऑटो-डेबिट पद्धतीने थेट खात्यातून वसूल केले जाते. अर्ज करण्यासाठी इच्छुक नागरिकांनी जवळच्या बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन अटल पेन्शन योजनेचा अर्ज भरावा.

पात्रता निकष काय आहेत?
अटल पेन्शन योजनेसाठी खालील पात्रता निकष लागू आहेत :
अर्जदार भारतीय नागरिक असावा
वय १८ ते ४० वर्षे असणे आवश्यक
बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते असणे गरजेचे
ईपीएफ, ईपीएस किंवा कोणत्याही सरकारी पेन्शन योजनेचा लाभार्थी नसावा
आधार कार्ड व मोबाईल नंबर लिंक असणे बंधनकारक
वृद्धापकाळासाठी सुरक्षित भविष्य

अटल पेन्शन योजनेला मिळालेली ही मुदतवाढ म्हणजे असंघटित क्षेत्रातील नागरिकांसाठी वृद्धापकाळातील आर्थिक सुरक्षिततेची मोठी हमी आहे. निश्चित पेन्शनमुळे भविष्याची चिंता कमी होऊन आत्मनिर्भरतेला बळ मिळणार आहे. त्यामुळे पात्र नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे.


595
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!