WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

वाशिष्ठी तीराला मिळणार अभेद्य संरक्षण!


वाशिष्ठी तीराला मिळणार अभेद्य संरक्षण!

वांगडे मोहल्ला परिसरात २४.९९ कोटींच्या पूरसंरक्षक भिंतीला मंजुरी

चिपळूण : शहरातील वाशिष्ठी नदीकाठावरील वांगडे मोहल्ला परिसरासाठी दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला असून, पूरसंरक्षक भिंत बांधण्यासाठी तब्बल २४ कोटी ९९ लाख रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून पुराच्या धोक्यात जीवन जगणाऱ्या नागरिकांमध्ये समाधान आणि सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

बहादुरशेख पुलापासून वांगडे मोहल्ला पर्यंतचा परिसर वाशिष्ठी नदीच्या काठावर वसलेला असून येथे मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती आहे. विशेषतः २२ व २३ जुलै २०२१ रोजी आलेल्या भीषण पुरामुळे या भागात मोठ्या प्रमाणात पाणी शिरून घरांचे व मालमत्तेचे मोठे नुकसान झाले होते. नदीच्या वाढत्या प्रवाहामुळे काठाची धूप होत असून अनेक घरांना धोका निर्माण झाला होता.

या गंभीर परिस्थितीची दखल घेत आमदार शेखर निकम यांनी गेल्या तीन वर्षांपासून शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, संबंधित विभागाने प्रत्यक्ष पाहणी करून तयार केलेल्या अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली आहे. हा प्रकल्प कोंकण पाटबंधारे विकास महामंडळ, ठाणे यांच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे.
या प्रक्रियेत अप्पर मुख्य सचिव (जलसंपदा) दीपक कपूर, मुख्य अभियंता कपोले, कार्यकारी अभियंता गणेश सलगर तसेच तांत्रिक पथकाचे मोलाचे योगदान लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्पाची अचूक आखणी करण्यात आली.

दरम्यान, हा प्रकल्प केवळ पहिला टप्पा असून पुढील टप्प्यात पेठमाप स्मशानभूमी ते होळी कट्टा तसेच फरशी पूल ते होळी कट्टा या भागांतील पूरसंरक्षक भिंतींसाठीही जून-जुलैमध्ये मंजुरी मिळविण्याचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले आहे.

या कामाला मंजुरी मिळाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्राताई पवार, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, पालकमंत्री उदय सामंत तसेच संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आमदार शेखर निकम यांनी आभार मानले आहेत.

“बोले तैसा चाले, त्याची वंदावे पावले” या उक्तीप्रमाणे विकासकामांत सातत्य ठेवणाऱ्या नेतृत्वामुळेच हा महत्त्वाचा प्रकल्प मार्गी लागल्याची भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.

वर्षानुवर्षे पुराच्या भीतीत जगणाऱ्या वाशिष्ठी काठावरील नागरिकांसाठी हा प्रकल्प केवळ भिंत नसून सुरक्षित आणि स्थिर भविष्यासाठीचा भक्कम पाया ठरणार आहे.

 

 


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!