WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

सांगलीत अपहरण सावर्डेत विक्री


 सांगलीत अपहरण सावर्डेत विक्री

सांगली एलसीबीकडून टोळीचा पर्दाफाश, एकास अटक, दोघे पसार

चिपळूण/सांगली : राजस्थानहून फुगे विकण्यासाठी सांगलीत आलेल्या एका गरीब दाम्पत्याच्या वर्षभराच्या चिमुकल्याचे दिवाळीच्या पहिल्याच दिवशी अपहरण करून त्याची विक्री चिपळूण-सावर्डे येथील ट्रान्सपोर्ट व्यावसायिकास करण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीचा सांगली स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने (एलसीबी) पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी या प्रकरणात एका संशयिताला अटक केली असून दोन जण पसार आहेत. पोलिसांच्या अथक प्रयत्नांनंतर ७२ तासांच्या तपासानंतर तान्हुला सुखरूप सापडला असून तो आता आपल्या आईच्या कुशीत परतला आहे.

घटनेचा धक्कादायक प्रकार

राजस्थानमधील गरीब फुगे विक्रेते विक्रम पशपचंद बागरी व त्यांची पत्नी हे सांगलीतील विश्रामबाग परिसरात वास्तव्यास होते. दिवाळीच्या पहिल्या दिवशी रस्त्याच्या कडेला झोपलेल्या या दांपत्याच्या वर्षभराच्या बाळाचे अपहरण करण्यात आले. काही तासांतच सांगली पोलिसांनी तपास सुरू केला.फिर्यादी विक्रम बागरी यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तपासात पोलिसांना समजले की, इनायत अब्दुलसत्तार गोलंदाज (वय ४३, रा. किल्ला भाग, मिरज), तसेच इम्तियाज पठाण व त्याची पत्नी वसीमा इम्तियाज पठाण या तिघांनी मिळून बाळ विक्रीचा गुन्हेगारी कट रचला होता.

चिपळूण-सावर्डे येथील धागा

वसीमा हिची बहीण वहिदा ही सावर्डे (चिपळूण) येथे वास्तव्यास आहे. तिची ओळख स्थानिक ट्रान्सपोर्ट व्यावसायिक राजेशिर्के व त्यांच्या पत्नीशी होती. या ओळखीच्या माध्यमातून वसीमा व तिच्या साथीदारांनी “बाळ दत्तक देतो” या बहाण्याने अडीच लाख रुपयांचा सौदा ठरविला. वर्षभरापूर्वीच त्यांना दीड लाख रुपये आगाऊ देण्यात आले होते. याच योजनेनुसार दिवाळीच्या पहिल्या दिवशी बाळाचे अपहरण करण्यात आले होते.

पोलिसांचा ७२ तासांचा श्वास रोखून ठेवणारा तपास

पहरणाची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक बारवकर व पोलिस उपअधीक्षक प्रवीण गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.या पथकात सहा. पोलीस निरीक्षक पंकज पवार, चेतन माने, तसेच हवालदार संदीप नलावडे, अमीरशा, सपना गराडे, अमर नरळे, सागर लवटे, नागेश खरात, दरिबा बंडगर, संदीप गुरव, मच्छिद्र बर्डे, सतिश माने, अनिल कोळेकर, उदयसिंह माळी, महादेव नागणे, सुनिता शेजाळे, विक्रम खोत, केरूबा चव्हाण, विनायक सुतार, सुरज थोरात, सुशिल म्हस्के, श्रीधर बागडी, ऋतुराज होळकर, सुमित सुर्यवंशी, सोमनाथ पंतगे, सत्या पाटील तसेच सावर्डे पोलीस ठाण्याचे गगनेश पट्टेकर, उमेश कांबळे, साधना ओमासे यांनी सहभाग घेतला. सर्व अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी दिवाळीच्या सुट्ट्यांचा विचार न करता संपूर्ण ७२ तास झोपेचा त्याग करून सतत तपास केला. अखेर त्यांनी अपहरणकर्त्यांच्या टोळीचा माग काढला आणि बाळाला सुखरूप शोधून काढले.

‘खरी दिवाळी पोलिसांनीच केली’

आपले लेकरू हरवल्यानंतर तिन्ही दिवस उपाशीपोटी टाहो फोडणाऱ्या गरीब दाम्पत्याच्या डोळ्यांत अश्रूंचा पूर आला होता. मात्र पोलिसांनी त्यांचे बाळ परत मिळवून दिल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहू लागला. पोलिसांनीही या क्षणाला “खरी दिवाळी” म्हणून जल्लोष साजरा केला.

पुढील कारवाई

पोलिसांनी इनायत गोलंदाज यास अटक केली असून इम्तियाज पठाण व त्याची पत्नी वसीमा हे दोघे अद्याप फरार आहेत. त्यांचा शोध सुरू असून त्यांना लवकरच गजाआड केले जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

या धाडसी कारवाईमुळे सांगली व रत्नागिरी पोलिसांचे जनसामान्यांमधून मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.

 


620
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!