पैशांच्या हव्यासापोटी बालकाचे अपहरण
पोलीस तपासात उघड, चिपळूण तालुका हादरला, सावर्डे पोलिसांचेही कौतुक
चिपळूण : सांगलीतील विश्रामबाग चौक परिसरातून एक वर्षाच्या बालकाचे अपहरण करून रत्नागिरी जिल्ह्यातील सावर्डे (तालुका चिपळूण) गावात विक्री केल्याचा घृणास्पद प्रकार शुक्रवारी उघडकीस आला आहे. तीन दिवसांच्या अथक तपासानंतर सांगली पोलिसांनी अपहृत बालकाला सुखरूप शोधून काढले. या प्रकरणामुळे सावर्डेसह चिपळूण तालुकाही हादरला आहे. पोलिसांच्या तपासात काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या असून पैशांच्या हव्यासापोटी या अपहरणाचा कट रचला गेल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. दरम्यान, या कटात सहभागी झालेले आणखी दोघे पसार असल्याने त्यांचा शोध घेण्यासाठी सांगली पोलिसांच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने (एलसीबी) तपासाची गती वाढवली आहे.
अपहरण प्रकरणातील मुख्य आरोपी इनायत अब्दुलसत्तार गोलंदाज (वय ४३, रा. मिरज) यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. फिर्यादी विक्रम पुष्पचंद बागरी (विश्रामबाग चौक, सांगली, मूळ रा. कनवास, ता. कनवास, जि. कोटा, राज्य राजस्थान) हे आपल्या कुटुंबासह विश्रामबाग चौक परिसरात फुगे विक्रीचा व्यवसाय करतात. दि. २० ते २१ ऑक्टोबरच्या रात्री त्यांचा १ वर्षाचा मुलगा आईजवळ झोपलेला असताना अज्ञात चोरट्याने त्याचे अपहरण केले. या घटनेनंतर विश्रामबाग पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
तांत्रिक माहितीवरून सुगावा
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सांगलीचे पोलीस अधिक्षक संदीप घुगे व अपर पोलीस अधिक्षक कल्पना बारवकर यांनी विश्रामबाग पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला तातडीने पथके तयार करून तपासाचे आदेश दिले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला.
ताब्यात घेतल्यानंतर कबुली
मिळालेल्या माहितीनुसार, इनायत गोलंदाज यास मिरज येथून ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने कबूल केले की, त्याने इम्तियाज पठाण आणि वसीमा पठाण यांच्या मदतीने विश्रामबाग चौकातून बालकाचे अपहरण केले व रत्नागिरी जिल्ह्यातील सावर्डे गावात ते सुपूर्द केले.
सावर्डेतून बालक सुखरूप परत
त्यानंतर पोलिस पथक रत्नागिरी जिल्ह्यात रवाना झाले व स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने सावर्डे गावातील सचिन राजेशिर्के यांच्या ताब्यात ते बाळ सापडले. राजेशिर्के दाम्पत्याने कबूल केले की, त्यांना मुलबाळ नसल्याने वसीमा पठाण व तिच्या साथीदारांनी कायदेशीर प्रक्रियेतून बाळ मिळवून देतो, असे खोटे सांगून त्यांच्याकडून पैसे घेतले होते. दिवाळीच्या मुहूर्तावर त्यांनी बाळ आपल्याकडे सुपूर्द केले तसेच दिवाळीनंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करू, असे खोटे सांगितल्याची माहिती दिली.
आई-वडिलांचे अश्रू अनावर
बालकाची वैद्यकीय तपासणी करून पोलीस अधिक्षक संदीप घुगे व अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या उपस्थितीत ते बाळ आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आले. तब्बल तीन दिवसानंतर आपल्या मुलाला सुखरूप पाहताच आईवडिलांना अश्रू अनावर झाले. पोलिसांनी बाळाला मिठाई देत ते बाळ त्यांच्या स्वाधीन केले. या तपास कार्यात सावर्डे पोलीस स्थानकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल गगनेश पट्टेकर, उमेश कांबळे, महिला पोलीस कॉन्स्टेबल साधना ओमासे यांनीही विशेष सहकार्य केले. मुलाला ताब्यात घेतल्यानंतर विक्रम बागरी व त्यांच्या पत्नीने सांगली जिल्हा पोलीस, रत्नागिरी जिल्हा पोलीस व सावर्डे पोलीस दलाचे आभार मानले.
इम्तियाज पठाण अट्टल गुन्हेगार
अपहरण प्रकरणातील मुख्य आरोपी इनायत गोलंदाज यास पुढील तपासासाठी विश्रामबाग पोलिसांकडे वर्ग करण्यात आले असून इम्तियाज पठाण व वसीमा पठाण हे दोघेही अद्याप पसार आहेत. त्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, इम्तियाज पठाण हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी खंडणी, फसवणूक, विनयभंग, दुखापत व आर्म अॅक्टचे गुन्हे दाखल आहेत. इम्तियाज पठाण व वसीमा पठाण यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथके कार्यरत असून लवकरच त्यांना ताब्यात घेतले जाईल, असे पोलिसांनी सांगितले.













