WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

हापूस आंब्याचा मोहर करपला, त्याची तरी भरपाई द्या : शौकतभाई मुकादम शेती नुकसान भरपाईचा अजूनही पत्ता नाही; शेतकरी अडचणीत


हापूस आंब्याचा मोहर करपला त्याची तरी भरपाई द्या : शौकतभाई मुकादम

शेती नुकसान भरपाईचा अजूनही पत्ता नाही; शेतकरी अडचणीत

चिपळूण : तालुक्यात भात शेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून त्याबाबत शासनाकडून पंचनामे करण्यात आले आहेत. मात्र अद्याप शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा एकही रुपया मिळालेला नाही. हा कोकणातील शेतकऱ्यांवरील अन्याय असल्याची टीका पंचायत समितीचे माजी सभापती व पर्यावरणप्रेमी शौकतभाई मुकादम यांनी केली आहे.

मुकादम यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोकणातील शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह प्रामुख्याने भात शेती आणि हापूस आंबा या दोन पिकांवर अवलंबून आहे. यावर्षी भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्याची भरपाई अद्याप मिळालेली नाही. त्यातच दूषित हवामानामुळे बागायतदारांच्या हापूस, काजू तसेच परस बागांतील आंब्याच्या झाडांवरील मोहर करपून गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुसरे मोठे संकट ओढवले आहे.

हापूस व काजूच्या मोहरावर करपा पडल्याने संभाव्य उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. खत व फवारणीसाठी केलेला खर्च वाया गेला असून उत्पन्नाचे प्रमुख साधनच बुडाले आहे. परिणामी कोकणातील शेतकरी व बागायतदार गंभीर आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

या पार्श्वभूमीवर कृषी विभागामार्फत तातडीने पंचनामे करून शासनाने नुकसान भरपाई जाहीर करावी, अशी मागणी शौकतभाई मुकादम यांनी शासनाकडे केली आहे.


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!