WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

अजित दादा परत या…


अजित दादा परत या…

अजित पवार अनंतात विलीन

साश्रू नयनानी अखेरचा निरोप; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

बारामती : “अजित दादा परत या…”, “अजित दादा अमर रहे…” अशा गगनभेदी घोषणा, हजारो कार्यकर्त्यांच्या डोळ्यांतील अश्रू आणि जनसागराच्या उपस्थितीत महाराष्ट्राचे लाडके नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आज बारामती येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. महाराष्ट्राच्या राजकारणातील एका झंझावाती पर्वाचा आज अखेर अंत झाला. त्यांचे सुपुत्र पार्थ आणि जय पवार यांनी आपल्या वडिलांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला, तेव्हा उपस्थित असलेल्या हजारो समर्थकांचे आणि कार्यकर्त्यांचे डोळे पाणावले होते.

अवघा महाराष्ट्र आज सुन्न असून निःशब्द आहे.

अंत्ययात्रेला दिग्गजांची हजेरी

अजित पवारांच्या अंतिम दर्शनासाठी आणि अंत्यविधीसाठी देशातील आणि राज्यातील दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह संपूर्ण पवार कुटुंब या दुःखद प्रसंगी एकत्र होते. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. तसेच केंद्रीय मंत्री रामदास आठवले, मुरलीधर मोहोळ, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, हसन मुश्रीफ, चंद्रकांत पाटील, छगन भुजबळ, मंत्री पंकजा मुंडे, निलम गोऱ्ह, आदिती तटकरे यांनीही आपल्या लाडक्या सहकाऱ्याला अखेरचा निरोप दिला. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्यासह विविध राज्यांतील मंत्री आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. तत्पुर्वी राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.

शासकीय इतमामात निरोपः मानवंदना

महाराष्ट्र शासनाच्या वतीने अजित पवार यांना पूर्ण शासकीय इतमामात निरोप देण्यात आला. पोलिस दलाच्या वतीने हवेत तीन वेळा फायर करुन सलामी देण्यात आली असून मानवंदना देण्यात आली. यावेळी जनसमुदाय निःशब्द झाला, जेव्हा पोलिसांच्या तुकडीने हवेत गोळ्या झाडून मानवंदना दिली, तेव्हा उपस्थित जनसागराने ‘एकच वादा, अजित दादा’, अजित दादा अमर रहे अमर रहे अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. पार्थ पवार, जय पवार यांनी मुखाग्नी दिला

अख्खी बारामती शोकाकुळ

अजित पवारांचे पार्थिव जेव्हा अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आले, तेव्हा बारामतीतील रस्ते जनसागराने ओसंडून वाहत होते. आपल्या नेत्याची एक झलक पाहण्यासाठी लोक घरांच्या छतावर, झाडांवर चढले होते. विशेषतः महिला कार्यकर्त्या आणि तरुण वर्गामध्ये मोठी शोककळा पाहायला मिळाली. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यासह कुटुंबातील सदस्यांचे अश्रू अनावर झाले होते, ते पाहून उपस्थित जनसमुदायही हेलावून गेला.


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!