गुहागर-चिपळूण मार्गावर वातानुकूलित ई-बसेस धावणार
आ. भास्करराव जाधव यांच्या पत्रावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे सकारात्मक आश्वासन
चिपळूण : कोकणातील प्रवाशांसाठी दिलासादायक ठरणाऱ्या महत्त्वाच्या निर्णयाच्या दिशेने पाऊल टाकले जाणार असून, चिपळूण-गुहागर-असगोली मार्गावर वातानुकूलित ई-बसेस सुरू करण्याबाबत राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. तसेच रत्नागिरी जिल्ह्यासाठी नव्या वातानुकूलित बसेस उपलब्ध करून देण्याबाबतही तातडीने निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे नुकतेच कोकण दौऱ्यावर आले असताना त्यांनी चिपळूण बसस्थानकाची पाहणी केली. यावेळी शिवसेना उबाठाचे नेते व आमदार भास्करराव जाधव यांच्या वतीने नगरसेवक फैसल कास्कर, बाळा आंबुर्ले, अजय भालेकर आणि संतोष तांदळे यांनी त्यांचे स्वागत केले.
या भेटीदरम्यान आमदार भास्करराव जाधव यांनी यापूर्वी परिवहन मंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनाची आठवण करून देण्यात आली. या निवेदनात चिपळूण-गुहागर-असगोली या महत्त्वाच्या मार्गावर पर्यावरणपूरक आणि आधुनिक सुविधांनी सुसज्ज अशा वातानुकूलित ई-बस सेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. कोकणातील पर्यटनवाढ, प्रवाशांची वाढती संख्या आणि आरामदायी प्रवासाची गरज लक्षात घेता ही मागणी करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.
याशिवाय रत्नागिरी जिल्ह्यात सध्या कार्यरत असलेल्या अनेक शिवशाही बसेस वारंवार नादुरुस्त होत असल्याने प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे जिल्ह्यासाठी नवीन शिवाई किंवा शिवनेरी या वातानुकूलित बसेस उपलब्ध करून देण्याची मागणीही आमदार जाधव यांनी निवेदनातून केली होती.
या दोन्ही मागण्यांची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गांभीर्याने दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून तात्काळ निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे चिपळूण-गुहागर परिसरातील प्रवासी, विद्यार्थी, कर्मचारी तसेच पर्यटकांना भविष्यात अधिक सुरक्षित, आरामदायी आणि आधुनिक सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या निर्णयामुळे कोकणातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला नवे बळ मिळणार असून, पर्यावरणपूरक ई-बस सेवेमुळे इंधन खर्चात बचत होण्यासह प्रदूषण कमी करण्यासही मदत होणार आहे. त्यामुळे या प्रस्तावित सेवेकडे प्रवाशांचे लक्ष लागून राहिले आहे.














